८९ लाखांची वनसंपदा राख
By Admin | Updated: March 6, 2015 01:42 IST2015-03-06T01:41:52+5:302015-03-06T01:42:49+5:30
मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चे संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना आणली.

८९ लाखांची वनसंपदा राख
नरेश रहिले गोंदिया
मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चे संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे, मात्र एकीकडे झाडे लावून ती जगविण्याचा खटाटोप सुरू असताना गुरुवारी सायंकाळी जिल्हाभरात २७२९ होळ्यांमधून १४ हजार ९५८ क्विंटल लाकडांची राखरांगोळी करण्यात आली. दुर्दैवाने या होळीत जाळण्यासाठी वापरलेली अर्ध्यापेक्षा जास्त लाकडे जीवंत झाडांवर कुऱ्हाड चालवून आणली होती.
जिल्ह्याच्या १६ पोलीस ठाण्यांतर्गत १ हजार ७७३ सार्वजनिक तर ९५६ होळ्या खासगीरित्या पेटविण्यात आल्या. प्रत्येक होळीत किमान ५ क्विंटल लाकडे जळाल्याचे गृहित धरले तरी १५ हजार लाकडांची किंमत आजघडीला ८९ लाख १२ हजार ४०० रूपये होते. होळीतून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी कितीही जनजागृती केली तरी प्रत्यक्षात परंपरा जपण्याकडेच नागरिकांचा कल असल्याचे यातून दिसून आले.
गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १२६ सार्वजनिक होळी तर खासगी ३००, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६५, खासगी २६, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४० तर खासगी ९१, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १७१ खासगी ५०, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६०, खासगी २१, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४० तर खासगी २६, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १६१ तर खासगी ७०, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १५० तर खासगी ४३, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ७६, खासगी १०, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक २४२, खासगी ४६, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३५, खासगी ५१, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ५६ तर खासगी ११५, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४३ तर खासगी १०, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ९१ तर खासगी ६० होळ्या पेटविण्यात आल्या.
एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र त्याच गावातील नागरिकांनी जंगलातील, शेतातील झाडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आजघडीला एक क्विंटल लाकडाची किमत ६०० रुपये सांगितले जाते.
या १४ हजार क्विंटल लाकडाची किंमत ८९ लाख १२ हजार ४०० रुपये होते. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिक जंगलातील लाकडे कापून होळीत जाळून आनंदोत्सव साजरा करतात. पर्यावरणाची हाणी करणाऱ्या या प्रकाराला टाळण्यासाठी मात्र नागरिकांकडून फारसा प्रतिसाद दिसत नाही.
होळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी ‘इको फ्रेन्डली होळी’ सारखे उपक्रम प्रत्येक गावात राबविले जाणे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने गरजेचे आहे. पण त्यासाठी शासनाकडून पुढाकार घेतला जात नाही.