गावकऱ्यांनी पकडले अवैध गौण खनिजाचे पाच टिप्पर
By Admin | Updated: February 13, 2015 01:13 IST2015-02-13T01:13:29+5:302015-02-13T01:13:29+5:30
परसटोला येथील गावकरी आणि ग्रा.पं.सदस्यांच्या पुढाकाराने एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाकरिता येत असलेले अवैध मुरूमाचे पाच टिप्पर ...

गावकऱ्यांनी पकडले अवैध गौण खनिजाचे पाच टिप्पर
देवरी : परसटोला येथील गावकरी आणि ग्रा.पं.सदस्यांच्या पुढाकाराने एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाकरिता येत असलेले अवैध मुरूमाचे पाच टिप्पर पकडण्यात आले. बिना रॉयल्टीने त्यांची वाहतूक सुरू होती. अखेर त्यांना तहसीलदाराकडे सुपूर्द करून कारवाई करण्यास बाध्य करण्यात आले. ही कारवाई गुरुवारी सकाळी ११ वाजता करण्यात आली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रा.पं. सदस्य प्रवीण दहीकर यांनी मंडळ अधिकाऱ्याला दूरध्वनीवर माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले. मात्र मंडळ अधिकाऱ्याने कामात व्यस्त असल्याचे सांगून घटनास्थळावर येण्यास नकार दिला. त्यानंतर दहीकर यांनी थेट तहसीलदारांकडे या पाचही गाड्यांकडे रॉयल्टी नसल्याचे व मंडळ अधिकारी येत नसल्याची तक्रार केली. तेव्हा तहसीलदारांनी मंडळ अधिकारी सिंधी मेश्राम व तलाठी गुप्ता यांना घटनास्थळावर जाण्याचा आदेश दिला. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पाचही टिप्पर तहसील कार्यालयात जमा केले. यानंतर सबंधित ठेकेदार तहसील कार्यालयात पोहोचले व त्यांनी तहसीलदाराला शासनाचे परिपत्रक दाखविले. कारवाई होण्यात वेळ लागत आहे, असे दिसताच ग्रा.पं. सदस्य व ग्रामवासीयांनी थेट तहसील कार्यालय गाठून तहसीलदार संजय नागटिळक यांना जाब विचारला. तेव्हा नागटिळक यांनी टिप्पर एमएच ३५/के-३८६८, एमएच ३६/पी-०२२८, एमएच ३५/के-१२३७, एमएच ३५/के-३८६९, एमएच २९/टी- ६६८ या पाचही टिप्परवर अवैध गौण खनिज अधिनियमाअंतर्गत कारवाई करून ३२ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या अवैध गौण खनिजचे पाच टिप्पर पकडून शासनाची तिजोरी भरून देण्यात ग्रा.पं. सदस्य दहीकर, संतोष मडावी, सुरेश वैद्य, प्रफुल भोयर, शिवचरण गुरूपंच नवलसिंग वट्टी, अरूण गायकवाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. (प्रतिनिधी)
दोन वर्षांपासून दुर्लक्ष
विशेष म्हणजे मागील दोन वर्षापासून तालुक्यात अवैध गौण खनिजाची वाहतूक सर्रासपणे होत आहे. परंतु तालुक्याचे तलाठी मूकदर्शक बनलेले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा कारभार बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्य ग्रामवासीयांना करावे लागत आहे.