पाच महसूल मंडळे आॅनलाईनपासून वंचित

By Admin | Updated: November 16, 2016 01:17 IST2016-11-16T01:17:00+5:302016-11-16T01:17:00+5:30

जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जवळपास सर्वच तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर, डोंगल आदी साहित्यांचा पुरवठा महसूल विभागाकडून करण्यात आला.

The five revenue departments are denied online | पाच महसूल मंडळे आॅनलाईनपासून वंचित

पाच महसूल मंडळे आॅनलाईनपासून वंचित

गोंदिया : जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जवळपास सर्वच तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर, डोंगल आदी साहित्यांचा पुरवठा महसूल विभागाकडून करण्यात आला. मात्र जिल्ह्यातील अनेक साज्यातून शेतकरी व नागरिकांना आॅनलाईन सातबारा मिळत नाही. शिवाय अनेक नागरिकांचे ई-फेरफार कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्याच्या महसूल मंडळातील पाच मंडळे अद्यापही आॅनलाईन होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे नागरिक व शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यात एकूण ३३ महसूल मंडळे आहेत. या महसूल मंडळांमध्ये एकूण ९४६ गावांचा समावेश आहे. यापैकी २८ मंडळे आॅनलाईन झाली आहेत. तर पाच मंडळांमध्ये कनेक्टिव्हिटी प्राब्लेम व इतर तांत्रिक अडचणींमुळे तेथील आॅनलाईन प्रक्रिया रखडली आहे. यात गोंदिया तालुक्यातील रतनारा व खमारी, तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव, आमगाव तालुक्यातील तिगाव व कट्टीपार या पाच गावांचा समावेश आहे.
शासनाच्या आदेशाने सर्व मंडळे आॅनलाईन केली जात आहेत. मॅन्युअल फेरफार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना समस्या होवू नये यासाठी नवीन साफ्टवेअर पुरविण्यात आले आहे. त्यात महसूल विभागाशी संबंधित कामांची डाटा एन्ट्री सुरू आहे. त्यासाठी तलाठ्यांना लॅपटॅप, प्रिंटर, नेटसाठी डोंगल, त्यासाठी दरमहा ७५० रूपये व जिल्हा सेतू संस्थेकडून आॅपरेटर्ससुद्धा पुरविण्यात आले आहेत. नवीन साफ्टवेअरच्या एडिट मॉड्युलमध्ये जावून संबंधित माहिती भरली जात आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत तलाठ्यांना देण्यात आली आहे. परंतु जिल्हाभरातील अनेक तलाठ्यांनी फेरफारचे कामच केले नसल्याचे समजते. कनेक्टिव्हिटीची समस्या उद्भवत असल्याने अनेकांचे संगणीकृत सातबारा, ८ अ, ई-फेरफार व त्यात दुरूस्तीचे काम रखडल्याचे तलाठ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकारामुळे अनेक नागरिक व शेतकरी अडचणीत आले आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने ई-फेरफारमधील अडचणी, नेट कनेक्टिव्हिटी-स्पीड, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांची पुनर्रचना, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये बांधून देणे, थकीत घरभाडे मंजूर करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. त्या अंतर्गत संपूर्ण तलाठी बुधवार दि.१६ नोव्हेंबरपासून बेमुदत संपात (सामूहिक रजा) सहभागी होत आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. त्यासाठी तलाठ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन या प्रस्तावित संपाची माहिती दिली.

Web Title: The five revenue departments are denied online