पाच भावी शिक्षकच कॉपीबहाद्दर
By Admin | Updated: December 15, 2014 22:58 IST2014-12-15T22:58:29+5:302014-12-15T22:58:29+5:30
आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम ज्या शिक्षकांचे असते ते भावी शिक्षकच जर आपल्या कृतीतून चुकीचा संदेश देत असतील तर त्यांच्या हातातील विद्यार्थी कसे घडणार? असा प्रश्न निर्माण होतो.

पाच भावी शिक्षकच कॉपीबहाद्दर
गोंदिया : आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम ज्या शिक्षकांचे असते ते भावी शिक्षकच जर आपल्या कृतीतून चुकीचा संदेश देत असतील तर त्यांच्या हातातील विद्यार्थी कसे घडणार? असा प्रश्न निर्माण होतो. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणाऱ्या अमरावतीच्या पाच भावी शिक्षकांच्या बाबतीत असाच प्रकार झाला. चक्क त्यांनी परीक्षेत कॉपी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
रविवारी (१४ डिसेंबर) गोंदियातील २८ केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली. शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा पास होणे अनिवार्य असते. महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या वतीने डीएड व बीएड पात्रता परीक्षा २८ केंद्रांवर घेण्यात आली. कोणतीही अनुचित घटना होवू नये यासाठी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच भरारी पथकांसह पोलीस व कॅमेरे लावण्यात आले होते.
दरम्यान शहरातील नूतन हायस्कूल या केंद्रावर उर्दू माध्यमाच्या पाच विद्यार्थ्यांना रंगेहात कॉपी करताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे गैरप्रकार करणारे सदर पाचही विद्यार्थी अमरावती जिल्ह्याचे आहेत. अमरावती जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरती परीक्षेच्या पेपरफुटीला काही दिवससुद्धा लोटले नसताना याच अमरावतीकरांनी गोंदिया जिल्ह्यालाही कलंकीत करण्याचा प्रकार केला, असे आता बोलले जात आहे.
सकाळी १० ते दुपारी १ वाजतापर्यंत १९ परीक्षा केंद्रांवरून चार हजार ९८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत एकूण नऊ केंद्रांवरून दोन हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इंग्रजी व उर्दू माध्यमाची परीक्षा सिव्हील लाईनमधील नूतन हायस्कूल या केंद्रात घेण्यात आली. यात कॉपी करताना उर्दू माध्यमाचे पाच विद्यार्थी पकडण्यात आले. गैरप्रकारानंतर पोलिसांनी त्या पाच भावी शिक्षकांना ताब्यात घेतल्याची माहिती जि.प.च्या शिक्षण विभागाने दिली आहे.
मागील दोन वर्षांपासून गोंदियातून हजारो विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार घडू नये यासाठी आठ झोनल अधिकारी, केंद्रावर एक सहायक परीक्षक याशिवाय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व शिक्षणाधिकारी यांचे प्रत्येकी एक असे एकूण पाच भरारी पथक तयार करण्यात आले होते.