मामा तलावांमधून मत्स्योत्पादन

By Admin | Updated: February 19, 2015 01:05 IST2015-02-19T01:05:36+5:302015-02-19T01:05:36+5:30

धान उत्पादकांच्या गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासोबतच जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी (मामा) तलावांची दुरूस्ती करून ...

Fish production from Mama Lake | मामा तलावांमधून मत्स्योत्पादन

मामा तलावांमधून मत्स्योत्पादन

गोंदिया : धान उत्पादकांच्या गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासोबतच जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी (मामा) तलावांची दुरूस्ती करून त्यातून मत्स्योत्पादन वाढीला चालना देण्याचे सुतोवाच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात बुधवारी (दि.१८) मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१५-१६ चा अंतिम प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी आयोजित सभेत गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेताना ते बोलत होते.
या सभेला पालकमंत्री राजकुमार बडोले, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, आ.नागो गाणार, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, नियोजन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील नागझिरा, नवेगावबांध आणि इटियाडोह या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी नियोेजन करावे, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, पर्यटनस्थळांच्या विकासामुळे जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येतील आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प नियोजनातून पूर्ण करावे. गोंदिया येथील सूर्याटोला तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी कमी पडणारा निधी पर्यावरण विभागाकडून उपलब्ध करून घ्यावा, हे सौंदर्यीकरण वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हा वार्षिक योजनेत नाविन्यपूर्ण योजनेतून निधी मागताना कल्पकतेने आणि नियोजनपूर्ण निधीची मागणी करावी, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, विकासात्मक कामे ही कायमस्वरूपी झाली पाहिजेत. जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या ३० टक्के आहे. या घटकातील शेतकऱ्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने एक नवीन एकात्मिक योजना जिल्हा वार्षिक योजनेतून तयार करावी, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातील जी गावे व्याघ्र प्रकल्पात गेली आहेत त्या गावातील नागरिकांना गॅस कनेक्शनचे वाटप त्वरीत करावे. जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजना हस्तांतरणाअभावी बंद आहेत त्या योजना सुरू करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी किंवा आऊट सोर्सीगव्दारे त्या योजना सुरू कराव्यात. त्यामुळे संबंधित गावांना नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील वीज भारनियमन बंद झाले पाहिजे असेही पालकमंत्री बडोले म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
झुडूपी जंगलामुळे अडथळे
जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी सादरीकरणातून गोंदिया जिल्हा दरडोई उत्पनात राज्यात २१ व्या क्रमांकावर असल्याचे सांगीतले. जिल्ह्यातील जमीन मोठ्या प्रमाणात झुडपी जंगलाखाली असल्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असून ही जमीन झुडपी जंगलाच्या कचाट्यातून काढल्यास विकासाला गती येईल, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील मत्स्य, पर्यटन, कृषी व सिंचन क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मामा तलावांची दुरूस्ती व नूतनीकरण
गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी तलावात मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन होऊ शकते. मत्स्योत्पादक शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी योजना तयार करून त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे ना.मुनगंटीवार म्हणाले. रेशीम विकास, ऊस लागवड वाढीकडे विशेष लक्ष देऊन लघुपाटबंधारे विभागाच्या तलावांच्या दुरूस्तीची कामे हाती घ्यावीत. शेतीपूरक असलेला दुग्ध व्यवसाय वाढीसाठी नियोजन करावे. येत्या दोन ते अडीच वर्षात जिल्ह्यातील सर्व माजी मालगुजारी तलावांचे नुतनीकरण व दुरूस्ती करण्याची सूचना त्यांनी केली.
८० कोटींच्या नियतव्ययास मंजुरी
या सभेत गोंदिया जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१५-१६ च्या ८० कोटी ९३ लक्ष रुपयांच्या जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या नियतव्ययास या राज्यस्तरीय सभेत मान्यता प्रदान करण्यात आली. सभेत ९५ कोटी २५ लक्ष रूपयांच्या अतिरीक्त मागणीची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास, रेशीम विकास कार्यक्रम, नागरी सुविधा, जनसुविधेसाठी विशेष अनुदान, नगरोत्थान अभियान, नागरी दलितेतर सुधारणा कार्यक्रम, शासकीय इमारती व निवासी इमारतीची बांधकाम, कोल्हापुरी पध्दतीची बंधारे, अपारंपरिक उर्जा विकास, पेयजल योजना, रस्ते व पूल, पशुवैद्यकीय दवाखान्यांचे बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम व साधनसामुग्री आदीसाठी निधीची अतिरीक्त मागणी करण्यात आली आहे. सभेला विविध विभागाचे प्रादेशिक व जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Fish production from Mama Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.