फायर इस्टिंगविशर कालबाह्य,पण लक्ष देणार कोण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:17 IST2021-01-13T05:17:02+5:302021-01-13T05:17:02+5:30

अर्जुनी मोरगाव : भंडारा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर देश हादरला असला तरी आरोग्य यंत्रणेने अद्याप यातून कोणताही धडा घेतला नाही. ...

Fire Eastwisher expired, but who cares () | फायर इस्टिंगविशर कालबाह्य,पण लक्ष देणार कोण ()

फायर इस्टिंगविशर कालबाह्य,पण लक्ष देणार कोण ()

अर्जुनी मोरगाव

: भंडारा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर देश हादरला असला तरी आरोग्य यंत्रणेने अद्याप यातून कोणताही धडा घेतला नाही. अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात मुदतबाह्य झालेले फायर इस्टिंगविशर लागले आहे. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने रुग्णांप्रति येथील वैद्यकीय अधिकारी किती सजग आहेत याची सुध्दा प्रचिती आली आहे.

फायर इस्टिंगविशरची रिफिलिंग कालबाह्य झाली असतानाही ते वेळेवर रिफिलिंग करण्याची तसदी घेतली जात नाही ही दुर्दैवी बाब आहे. एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार येथे सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्राला ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. येथील ग्रामीण रुग्णालयात सहा अग्निशमन यंत्रे आहेत. या यंत्रांची गॅस व पावडर रिफिलिंग २९ ऑक्टोबर २०१९ रोजी झाली होती. याची वैधता एक वर्षाची असते. ही मुदत २८ ऑक्टोबर २०२० रोजी संपली आहे. त्यानंतर तीन महिने लोटले मात्र अद्याप रिफिलिंग झालेली नाही. याचा अर्थ असा की गेल्या तीन महिन्यात कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने या रुग्णालयाला भेट दिलेली नाही. भेट दिली असती तर निश्चितच यात सुधारणा घडली असती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा रुग्णांप्रति किती सजग आहे याची प्रचिती येते.

ग्रामीण रुग्णालयातील विद्युत उपकरणांची झाकणे सताड उघडी आहेत. विद्युत वायर लोंबकळत आहेत. मात्र यावर आच्छादन करायला किंबहुना लक्ष द्यायला सवडच नाही. रुग्णालय परिसरात दारूची रिकामी बॉटल्स पडलेली आहेत. बुट्ट्या मारण्याची सवय मात्र नित्याचीच आहे.गत महिन्यात विषारी औषध प्राशन केल्याने धाबेटेकडी येथील एका इसमाचा मृत्यू झाला. या रुग्णालयात औषधे उपलब्ध नव्हती. अशी अत्यावश्यक औषधे रुग्ण कल्याण समितीच्या अडीच लाखांच्या निधीतून का केला जात नाही हा प्रश्न आहे. हा निधी घशात तर जात नाही ना, याची शहानिशा कधीच होत नाही.

वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयात राहात नसल्याची बऱ्याच वर्षांपासून तक्रार आहे. कोरोनाकाळात येथील वैद्यकीय अधीक्षक गायब असल्याची तक्रार खुद्द उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीचे काय झाले ते कळत नाही. या रुग्णालयात अनेक समस्या आहेत. अनेक तक्रारी होतात मात्र याकडे कुणीच वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने लक्ष घालत नसल्याची तक्रार आहे.

......

रुग्ण कल्याण समिती नावालाच

नावाला रुग्ण कल्याण समिती आहे. ही समिती रुग्णांच्या की वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठी आहे तेच कळायला मार्ग नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात रुग्ण कल्याण समितीचे फलक आहे त्यातील अनेक अधिकारी कितीतरी वर्षांपासून बदलून गेले आहेत. या फलकावरील नावे बदलण्यासाठी वेळ अधिकाऱ्यांकडे नाही.

Web Title: Fire Eastwisher expired, but who cares ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.