गोरेगाव (गोंदिया) : हिरापूरवरून गोरेगाव मार्गे गणखैरा येथे भरडाईसाठी धान वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक साईबारच्या पुढे आग लागली. परिसरातील नागरिकांनी धावत पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात ट्रकचे केबिन पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. ही घटना शनिवारी (दि.२६) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास प्रगती सुशिक्षित बेरोजगार संस्था मर्यादित घोटी या संस्थेच्या हिरापूर येथील गोदामातून भरडाईसाठी ट्रक क्रमांक एमएच ०४ जीसी ३८७७ ने हिरापूर येथून गोरेगाव मार्गे गणखैरा येथील राजफूड मिल येथे नेत असताना शहरातील साईबारच्या पुढे अचानक ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ट्रकला आग लागताच ट्रक चालक समीर शेख यांनी ट्रकवरून उडी घेतली. घटनेचे गांभीर्य पाहता याच परिसरात असलेल्या कैलास खरवडे यांच्या मोटरसायकल दुरुस्तीच्या दुकानातून पाईपद्वारे आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक सरसावले. तसेच परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरून पाणीपुरवठा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. यावेळी कैलास खरवडे, गुड्डू कटरे, राम अगडे यांच्या प्रसंगावधाने ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविता आले.
आग विझल्यानंतर आली अग्निशमन वाहने धान भरलेल्या ट्रकला आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी गोंदिया व गोरेगाव येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयाला या संदर्भात माहिती दिली. मात्र ट्रकला लागलेली आग विझल्यानंतर गोंदिया आणि गोरेगाव येथील अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यामुळे गोरेगाव नगरपंचायतच्या विरोधात घटनास्थळी जमलेले नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. प्रथम ट्रकला आग लागल्याची माहिती गोरेगाव नगरपंचायतला देण्यात आली. मात्र नगरपंचायतच्या नाकर्तेपणामुळे नगरपंचायतचे अग्निशमन वाहन घटनास्थळीत वेळेत पोहचले नाही.