आर्थिक वाद : जामिनावरील गोलू तिवारीचा माग काढत गोळ्या झाडून खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 09:12 PM2024-04-23T21:12:02+5:302024-04-23T21:12:33+5:30

जबलपूर येथील आरोपीसह सात आरोपींना अटक : २९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

Financial dispute Golu Tiwari on bail shot dead while tracking | आर्थिक वाद : जामिनावरील गोलू तिवारीचा माग काढत गोळ्या झाडून खून 

आर्थिक वाद : जामिनावरील गोलू तिवारीचा माग काढत गोळ्या झाडून खून 

नरेश रहिले, गोंदिया: आर्थिक देवाणी-घेवाणीवरून दोन गाड्यांवर चार जण सवार असलेल्या लोकांनी कुडवा नाका जवळील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर रोहीत उर्फ गोलू हरिप्रसाद तिवारी (३८) रा. गजानन कॉलनी गोंदिया यांच्यावर गोळ्या झाडून खून केला. ही घटना २२ एप्रिल रोजी रात्री ८:३० ते ९ वाजता दरम्यान घडली.

गोलू हरिप्रसाद तिवारी (३८) हे पाल चौकाकडून मोटारसायकलने रात्री ८:३० वाजता कुडवा नाकाकडे येत असतांना त्यांचा दोन मोटारसायकलने आरोपींनी पाठलाग केला. गोलू तिवारी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेजवळ पोहचताच त्याच्यावर बंदूकीतून गोळी झाडली. यात गोलूच्या छातीखाली उजव्या बाजूला गोळी अडकली. गोळी लागताच आपल्या बचावासाठी गोलू तिवारी मोटारसायकल जोरात हाकत गेले. परंतु कुडवा चौकातील शालीमार हॉटेलजवळ ते गाडीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी गोंदिया सहयोग हॉस्पीटल येथे नेले असतांना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोलू तिवारी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट पसरली त्यांनी सहयोग रूग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. यात दावने बंधूंना त्यांच्या घरूनच तर पाच आरोपींना देवरी येथून अटक केली आहे. घटनास्थळावर पोलिसांना फायर झालेल्या बंदुकीच्या काडतूसची खाली नळी मिळाली. आरोपींनी गोळीबार करतांना बंदुकीतून एकच गोळी झाडली असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांच्या लक्षात आले, अशी माहिती गोंदियाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहणी बानकर यांनी रामनगर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रपरिदेत दिली.
 

या सात आरोपींना केली अटक
या प्रकरणात मुख्य आरोपी मोहीत दिलीप मराठे (३६) रा. संजयनगर गोंदिया, राजेंद्र उर्फ बंटी शंकर दावने (४२), हिरो शंकर दावने (४२) दोन्ही रा. दसखोली गोंदिया, शिवानंद उर्फ सुजल सदानंद भेलावे (१९) रा. कृष्णपुरा वॉर्ड गोंदिया, विनायक रविंद्र नेवारे (२१) रा. गिरोला (पांढराबोडी), रितेश उर्फ सोंटू संजय खोब्रागडे (२३) कस्तुरबा वॉर्ड कचरा मोहल्ला गोंदिया, सतिश सुग्रीव सेन (२३) रा. पन्नानगर जबलपूर मध्यप्रदेश या सात जणांना अटक करण्यात आली. आरोपींवर भादंविच्या कलम ३०२, ३४, सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम ३७ (अ) १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल आहे. आरोपींना २९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


मृतकही होता खुनाचा आरोपी

सन २०१२ मध्ये रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या धरम दावने खुनाच्या प्रकरणात मृतक गोलू तिवारी हा आरोपी होता. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून त्यावर न्यायालयात ट्रायल सुरू आहे. जामीनावर असलेल्या गोलू तिवारीचा गोळ्या झाडून खून करण्यात आला.
 

मुख्य आरोपी मराठेवर हा खुनाचा दुसरा गुन्हा
या प्रकरणातील मुख्यसुत्रधार असलेल्या मोहीत दिलीप मराठे (३६) रा. संजयनगर गोंदिया याच्यावर सन २०२० मध्ये एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. आता केलेला हा दुसरा खून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Financial dispute Golu Tiwari on bail shot dead while tracking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.