सफाई कर्मचाऱ्यांचा संप भोवला
By Admin | Updated: July 18, 2014 00:08 IST2014-07-18T00:08:57+5:302014-07-18T00:08:57+5:30
विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचाऱ्यांनी आता कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. त्यांच्या या आंदोलनात मात्र सफाई कामगार सहभागी असल्याने शहरातील संपूर्ण सफाई व्यवस्था जाम झाली

सफाई कर्मचाऱ्यांचा संप भोवला
गोंदिया : विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचाऱ्यांनी आता कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. त्यांच्या या आंदोलनात मात्र सफाई कामगार सहभागी असल्याने शहरातील संपूर्ण सफाई व्यवस्था जाम झाली असून शहर घाणीच्या विळख्यात अडकले आहे. सफाई अभावी बघावे तेथे कचरा व घाणीची ढिगारे लागलेली दिसून येत आहे.
नगर परिषद कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरावर आंदोलन सुरू असून आपल्या मागण्यांच्या पूर्तीसाठी त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन्ही नगर पालिके तील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. गोंदियातील ५३६ व तिरोडातील २९ कर्मचारी सध्या संपावर असून विशेष म्हणजे या संपात सफाई कर्मचारी सहभागी झाले आहेत. सफाई कर्मचारी संपात सहभागी झाल्याने मात्र दोन्ही शहरांतील नागरिकांचे ब्लडप्रेशर हाय झाले आहे.
सफाई कर्मचाऱ्यांअभावी दोन्ही शहरातील सफाई व्यवस्था पूर्णपणे विस्कटली आहे. शहरात बघावे तेथे कचरा व घाणीचे ढिगार दिसू लागले आहेत. गोंदिया शहरात तर बाजार भागात अधिकच समस्या वाढली आहे. कचऱ्याचे कंटेनर भरगच्च झाले असून त्यातील कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याने आता त्यातून बाहेर कचरा पडत असल्याचे दिसत आहे. तर रस्त्यावर पडलेला कचरा आता पावसामुळे कुजत असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. शहरातील अन्य भागांत सुद्धा हाच प्रकार दिसून येत असून सफाईसाठी नागरिकांची ओरड सुरू झाली आहे. संपाचा हा तिसराच दिवस असल्याने अधिक गंभीर परिणाम अद्याप पुढे आलेले नाहीत. मात्र संपाचा कालावधी वाढत गेल्यास गंभीर परिणाम बघावयास मिळतील यात शंका नाही. अशात हा संप आता आणखी किती दिवस चालतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)