गटशेतीतून बदलणार जिल्ह्यातील शेतीचे चित्र
By Admin | Updated: January 28, 2016 01:42 IST2016-01-28T01:42:51+5:302016-01-28T01:42:51+5:30
शेतीकडे दुय्यम व्यवसाय म्हणून बघितले जाते. आज शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

गटशेतीतून बदलणार जिल्ह्यातील शेतीचे चित्र
कोदामेडीत कृषी ग्रामसभा : शेतकऱ्यांना देणार ‘स्मार्ट शेती’ करण्याचे तंत्र
गोंदिया : शेतीकडे दुय्यम व्यवसाय म्हणून बघितले जाते. आज शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जिल्ह्यात पाण्याची मुबलकता आहे. शेती कशी करावी याचे ज्ञानही आपल्या शेतकऱ्यांना अवगत असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता पारंपरिक पद्धतीत बदल करून समृद्ध शेतीचे तंत्र अवलंबवावे, त्यासाठी शेतकऱ्यांना हवे ते मार्गदर्शन दिले जाईल, असे पालकमंत्री राजकुमार बडोले सांगितले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी येथे राज्यातील पहिल्या कृषी ग्रामसभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प. आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापगते, अभिनव फार्मा क्लब पुणेचे प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोडखे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे, कोदामेडीच्या सरपंच अनिता बडोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पूर्वी कोदामेडी व तिडका परिसरात दुधाचे व भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येत होते. आज मात्र शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येते. गोंदिया जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून पाणीसुध्दा भरपूर आहे. या पाण्याचे नियोजन करून त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी करावा. शेतकऱ्यांनी आता सामुहिक शेतीचा अवलंब करु न गावागावातून भाजीपाला व दूधाची गाडी बाजारपेठेत गेली पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करावे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तिडका आाणि कोदामेडी या दोन्ही गावांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जि.प. अध्यक्ष मेंढे म्हणाल्या, शेतीची ग्रामसभा हा अभिनव उपक्र म आहे. ही ग्रामसभा शेतकऱ्यांसाठी जीवनदायी आहे. शेतकऱ्यांनी आता केवळ धानाच्या पिकावर अवलंबून न राहता नगदी पिकांची शेती करावी. त्यामुळे त्यांच्या जीवनात समृध्दी येईल. अशाप्रकारच्या शेतीतून अनेकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. शेतीविषयक ग्रामसभेमुळे कृषिविषयक योजना प्रभावीपणे राबविता येतील. शेतीच्या ग्रामसभा जिल्हयात झाल्या तर जिल्हयातील शेतकरी कर्जमुक्त होण्यास मदत होईल असे त्या म्हणाल्या. (जिल्हा प्रतिनिधी)
- शेतमालाला बाजारपेठेची गरज
अभिनव फार्माचे बोडखे म्हणाले, शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणारा वर्ग आहे. शेतीच्या ग्रामसभेतून गावातील शेतकर्यांना शेतीविषयक योजनांची माहिती मिळेल. त्यामुळे भविष्यात शेतकर्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. शेतीत शेतकरी खूप राबतो, पण मेहनतीच फळ त्याला अल्प मिळते असे सांगून बोडखे म्हणाले, आता शेतीतून किती पैसे कमावतो यालाच महत्व राहणार आहे.
जिल्ह्यात पाणी मुबलक आहे. या पाण्याचे नियोजन करु न चांगले पीक घेता येईल. उत्पादित माल थेट बाजारपेठेत विकावा. दलालाचा हस्तक्षेप होणार नाही याकडे लक्ष द्यावे. पृथ्वीवर मनुष्य प्राणी जीवंत आहे. तोपर्यंत जगाला शेतीवरच अवलंबून राहावे लागणार आहे. नियोजनबध्द शेती केली तर गावे शेतीतून समृध्द होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज मल्चिंग पेपरचा वापर शेतीत केला तर खुरपणीचा खर्च वाचणार आहे. गावातील शेतकऱ्यांनी आता सामूहिक पध्दतीने शेती करावी. गीर सारख्या देशी गायी घेऊन त्याच्या दुधाची, गोमूत्राची विक्र ी करावी. चांगले शेणखत या गाईपासून मिळणार असल्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल. स्मार्ट शेती करण्याची वेळ आता आली असल्याचे त्यांनी सांगितले.