शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या बँकांवर खटले भरणार
By Admin | Updated: August 3, 2014 00:09 IST2014-08-03T00:09:56+5:302014-08-03T00:09:56+5:30
गेल्या तीन वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ, गारपीट, पूर अशा अस्मानी संकटांना सामोरे जावे लागले. या संकटांचा सामना करीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना साडेतेरा हजार कोटींची

शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या बँकांवर खटले भरणार
उपमुख्यमंत्री पवार : निर्धार मेळाव्यातून राकाँं कार्यकर्त्यांना केले जागृत
गोंदिया : गेल्या तीन वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ, गारपीट, पूर अशा अस्मानी संकटांना सामोरे जावे लागले. या संकटांचा सामना करीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना साडेतेरा हजार कोटींची नुकसानभरपाई दिली. शेतकऱ्यांवर थकीत असलेले ७१ कोटींचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जी बँक सहकार्य करणार नाही त्या बँकेवर खटला दाखल करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
गोंदियाच्या पोवार बोर्र्डींग येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख, आ. राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्षमी तुरकर, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती टिकाराम मेंढे, बबलू कटरे व पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात जेवढी कामे झाली तेवढी कामे महाराष्ट्रातील क्वचितच एखाद्या लोकसभा क्षेत्रात झाली असतील. महाराष्ट्रातील सर्वात मोठा ३० हजार कोटींचा पॉवर प्लांट गोंदियाच्या तिरोडा येथे अदानी आणण्यात आला. महाराष्ट्रातील सात मेडीकल कॉलेजपैकी दोन मेडीकल कॉलेज विदर्भाला दिले असून त्यात गोंदियाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचनावर भर विदर्भावर देण्यात आला. गोसेखुर्दला तीन पॅकेल दिले. बावनथडीचा प्रकल्प प्रलंबित होता. मात्र तो प्रश्न प्रफुल्ल पटेलांनी मार्गी लावला. धापेवाडा सिंचन प्रकल्प आमच्या काळातच मंजूर करून पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. धापेवाडाचे पाणी अदानी प्रकल्पाला देण्यापूर्र्वी ते पाणी आधी पिण्यासाठी, नंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी व उरलेले पाणी उद्योगासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. सध्या केंद्रात असलेल्या सरकारने ‘अच्छे दिन आयेंगे’ असे स्वप्न दाखवून केंद्रात सत्ता स्थापन केली. परंतु अच्छे दिन कुणाचे याचा अंदाज लोकांना लागला असल्याचा टोला त्यांनी लावला.
यावेळी खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपण विकासाची कामे केली परंतु लोकसभेच्या निवडणुकीत जनतेचा आपल्यावरील विश्वास कमी पडला. याचे चिंतन करून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागू, असे ते म्हणाले. त्यांंनी आता होणाऱ्या रेल्वे भाडेवाढ व इतर वस्तूंच्या वाढणाऱ्या किमतीकडे लक्ष वेधले. केंद्राने धानाच्या हमीभावात केवळ ५० रुपये वाढ केली. शेतकऱ्यांना मिळणारा बोनस बंद करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केवळ निवेदने देऊन थांबू नये, तर रस्त्यावर उतरण्याची सवय लावली पाहीजे, असे आवाहन खा.पटेल यांनी केले.
यावेळी राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री अनिल देशमुख केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर आपल्या भाषणांमधून टिका केली. या मेळाव्याला १० हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संचालन गंगाधर परशुरामकर यांनी तर आभार शिव शर्मा यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)