शेतकऱ्यांनो, नफ्याच्या शेतीकडे वळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST2022-05-23T05:00:00+5:302022-05-23T05:00:15+5:30
शेतकऱ्याला व्यापारी होता आले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले. व्यापारी मोठे झाले, शेतकरी आहे तिथेच आहे. जो जोखीम पत्करतो, तो नफा कमावतो. यावर्षी टरबूज पीक घेणारे श्रीमंत झाले. आम्हाला धानाच्या मानसिकतेतून बाहेर पडून पीकबदल करीत नफ्याच्या शेतीकडे वळावे लागेल. जो शेतकरी अफाट कष्ट करतो, तो हिताच्या मार्गदर्शन मेळाव्यात तासभर बसू शकत नाही, ही शोकांतिका आहे.

शेतकऱ्यांनो, नफ्याच्या शेतीकडे वळा
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी राबराब राबतो. मात्र, उत्पन्न आणि खर्चाचे गणित करीत नाही. शेतकऱ्याला व्यापारी होता आले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले. व्यापारी मोठे झाले, शेतकरी आहे तिथेच आहे. जो जोखीम पत्करतो, तो नफा कमावतो. यावर्षी टरबूज पीक घेणारे श्रीमंत झाले. आम्हाला धानाच्या मानसिकतेतून बाहेर पडून पीकबदल करीत नफ्याच्या शेतीकडे वळावे लागेल. जो शेतकरी अफाट कष्ट करतो, तो हिताच्या मार्गदर्शन मेळाव्यात तासभर बसू शकत नाही, ही शोकांतिका आहे. मेळाव्यामधून शेतकरी हिताचे ज्ञान मिळते. ज्ञानाची भूक नसणारा शेतकरी अज्ञानी होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. अधिक उत्पादन घेऊन समृद्ध व्हावे, असे मार्गदर्शन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित शेतकरी मेळावा व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रमोद लांजेवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, कृषितज्ज्ञ डॉ. सी. आर. श्यामकुवर, रंगनाथ कटरे, उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, शास्त्रज्ञ अनिल पाटील, नागपूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य देवानंद पंचभाई, नगराध्यक्ष मंजूषा बारसागडे, उपसभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, नगरसेविका शीला उईके, कृउबास प्रशासक गिरीश पालीवाल, बन्सीधर लंजे, गटविकास अधिकारी विलास निमजे उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. चंद्रिकापुरे यांनी, माझ्या भागातील शेतकरी संपन्न होण्यासाठी या भागात उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेची गरज आहे. प्रत्येक शेतकरी उत्पादन करतो. मात्र, तो व्यापारी होऊ शकला नाही. इतर लोक मोठे होत असताना तो मोठा होऊ शकला नाही हे दुर्दैव आहे. जे शेतकरी नवीन प्रयोग करतात, ते प्रगतीच्या अश्वमेघावर आरूढ होतात. तंत्रज्ञानाचे नवे तंत्र वापरले पाहिजे. वातावरणानुसार कोणते व कसे पीक घेतले पाहिजे, मालाला कशी बाजारपेठ उपलब्ध होईल, यावर आधारित पिके घेतली पाहिजेत, असे सांगितले.
मेळाव्यात डॉ. श्यामकुवर यांनी धान पीक, डॉ. भोसले यांनी पीक बदल व डॉ. खोब्रागडे यांनी भाजीपाला या विषयावर मार्गदर्शन केले. या भागातील मोहफुलावर आधारित वायनरी प्रोजेक्ट उभारण्याची माहिती दिली. कटरे यांनी राष्ट्रीय कृषी बाजारपेठ योजनेबद्दल माहिती दिली. प्रत्येकाने इनाम अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रशासक लोकपाल गहाणे यांनी मांडले. संचालन प्रशासक उद्धव मेहेंदळे यांनी केले. आभार संजय सिंगनजुडे यांनी मानले.