गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By अंकुश गुंडावार | Updated: July 25, 2023 18:54 IST2023-07-25T18:53:52+5:302023-07-25T18:54:17+5:30
श्रीकृष्ण जगन भोयर (३६) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
देवरी : शेतकऱ्याने शेतालगत असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी तालुक्यातील ग्रामपंचायत गोटाबोडी अंतर्गत येणाऱ्या आवरीटोला येथे उघडकीस आली. श्रीकृष्ण जगन भोयर (३६) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार श्रीकृष्ण भोयर हे शेतात रोवणीच्या कामासाठी जातो असे सांगून मंगळवारी सकाळी ८ वाजता शेतात गेला. तो मजुरांसोबत शेतीची कामे करीत होता. दरम्यान, पाण्याचे इंजिन बंद करून येतो म्हणून त्याने मजुरांना सांगितले. अर्धा तास लोटूनही तो परत न आल्याने मजुरांनी व त्याच्या चुलत भावाने त्याचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान, तो शेतालगत असलेल्या नाल्याजवळ आंजनाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.
मजुरांनी त्याला खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे आणले असता डॉक्टरांनी श्रीकृष्णला मृत घोषित केले. श्रीकृष्णने नेमकी कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र कळू शकले नाही. त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा आप्त परिवार आहे. देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास पो.ह. ग्यानिराम करंजेकर करीत आहेत.