धान खरेदी बंदीचा शेतकर्यांना फटका
By Admin | Updated: May 12, 2014 23:48 IST2014-05-12T23:48:37+5:302014-05-12T23:48:37+5:30
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरू असलेली धान खरेदी १५ मे पासून बंद करण्याचे राज्य शासनाचे आदेश

धान खरेदी बंदीचा शेतकर्यांना फटका
संतोष बुकावन - अर्जुनी/मोरगाव आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरू असलेली धान खरेदी १५ मे पासून बंद करण्याचे राज्य शासनाचे आदेश धडकल्याने वैदर्भिय शेतकर्यांत नैराश्य आले आहे. या परिपत्रकाविरोधात १४ मे रोजी अर्जुनी/मोरगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २0१३-१४ मध्ये धान खरेदी करण्यासाठी शासनाने १८ ऑक्टोबर २0१३ रोजी मंजूरी दिली होती. त्यानुसार राज्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थामार्फत ५ मे अखेर १९.९0 लक्ष क्विंटल धान खरेदी करण्यात आली. खरीप पणन हंगाम २0१३-१४ साठी शेतकर्यांना धान खरेदीवर किमान आधारभूत किंमतीपेक्षा अतिरिक्त २00 रूपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याची घोषणा शासनाने १८ फेब्रुवारी रोजी केली होती. या योजनेंतर्गत शेजारच्या मध्यप्रदेश राज्यात २५ जानेवारी व छत्तीसगड राज्यात १५ फेब्रुवारीपासून धान खरेदी बंद झालेली आहे. ही दोन्ही राज्ये विदर्भाला लागून असल्याने तसेच महाराष्ट्रात किमान आधारभूत किंमतीपेक्षा २00 रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर झाल्याने शेजारच्या राज्यातून मोठय़ा प्रमाणात धानाची आवक महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. पावसाळी हंगामातील धानाची विक्री शेतकर्यांकडून जवळजवळ पूर्ण झालेली आहे. रबी हंगामात उत्पादित होणार्या धानामधून भरडाईअंती येणारा उतारा हा केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ६७ टक्के होत नाही. शिवाय रब्बी हंगामातील धानाचे उत्पादन हे केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे होत नाही. केंद्र शासनाने ३१ जुलै २0१३ रोजी देशातील सर्व राज्यांचे सचिव (अन्न) व भारतीय अन्न महामंडळाच्या अधिकार्यांची खरीप पणन हंगाम २0१३-१४ मधील धान, भरडधान्य खरेदीच्या नियोजनासाठी बैठक घेतली होती. त्यात महाराष्ट्रातील खरीप पणन हंगाम हा ऑक्टोबर २0१३ ते फेब्रुवारी २0१४ हा निश्चित केला होता. त्यामुळे खरीप हंगामातील धान खरेदी १५ मे पासून बंद करण्यात यावी, असे आदेश धान खरेदी करणार्या दोन अभिकर्ता संस्थांना देण्यात आले आहेत. शासनाच्या या आदेशामुळे धान उत्पादक शेतकर्यांवर मोठा अन्याय केला जात आहे. व्यापारी वर्ग शेतकर्यांची पिळवणूक करीत आहे. यासाठी १४ मे रोजी दुपारी १ वाजता आ. नाना पटोले, आ. राजकुमार बडोले, माजी आ. दयाराम कापगते, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव डोंगरवार, तालुका भाजपाध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार यांचे नेतृत्वात टी प्वाईंट अर्जुनी/मोरगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतकर्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीचे अध्यक्ष, लक्ष्मी सहकारी धान गिरणीचे अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी केले आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा शिवसेनातर्फे शासनाच्या या परिपत्रकाचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. असून आयोजित आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. हे परिपत्रक तातडीने रद्द करून शेतकर्यांची धानखरेदी त्वरित करावी व ती अखंडीत असावी, अशी मागणी करण्यात आली आहे.