श्री पद्धतीने लागवडीत शेतकऱ्यांची अनास्था
By Admin | Updated: August 6, 2014 23:55 IST2014-08-06T23:55:17+5:302014-08-06T23:55:17+5:30
शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि त्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ व्हावी याकरिता विविध उपाययोजना आखून त्याची प्रसिद्धी करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना त्यात काही अडचणी

श्री पद्धतीने लागवडीत शेतकऱ्यांची अनास्था
काचेवानी : शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि त्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ व्हावी याकरिता विविध उपाययोजना आखून त्याची प्रसिद्धी करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना त्यात काही अडचणी येत असल्याने शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
श्री पद्धतीने शेती करावी, यातून वेळेची, धानाची बचत होवून दीड पटीने उत्पन्न वाढ होत असल्याचे कृषी विभाग सांगते. तसेच कृषी विभागाचे कर्मचारी शेतात जावून श्री पद्धतीने लागवड करण्याविषयी मार्गदर्शन करतेवेळी शेतकरी ऐकण्यास तयार नाहीत. यावरुन श्री पद्धत शेतकऱ्यांकरिता वरदान असली तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी श्री पद्धतीचा वापर करण्यास ईच्छुक नाहीत. याबाबतची माहिती काढली असता श्री पद्धतीला वातावरणाची मोकळीकता हवी, रोवण्या करणाऱ्या मजुरांची संख्या भरपूर असावी. मात्र यावेळी पावसाच्या भीतीने आणि रोवण्याला उशीर झाल्याने सर्वच शेतकरी कामाला लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात रोवण्या सुरु असल्याने एक-दोन महिलाच रोवणे लावत आहेत. यावेळी थोडासाही वेळ वाया घालविण्याची हिंमत कोणत्याही शेतकऱ्यात नाही. त्यामुळे कृषी विभागाचे कर्मचारी किंवा अधिकारी किंवा शेती तज्ज्ञ असो, कोणाचाही सल्ला ऐकण्यास शेतकरी तयार नाही.
श्री पद्धतीने रोवणी करण्याचा गाजा-वाजा कृषी विभाग नेहमी करीत असतो. याचे फायदेही दिसून येतात. तरी शेतकरी कोणत्याही माध्यमाची ऐकून घेण्यास तयार नाही. कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि मंडळ कृषी अधिकारी यांना शेतकरी उलट-सुलट बोलून आपला संताप व्यक्त करीत असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे.
बळीराजा निसर्गाच्या कोपामुळे, वाढत्या महागाईमुळे आणि मजुरांच्या टंचाईमुळे पूर्वीपासूनच घाबरलेला आहे. यावेळी एक महिना पावसाला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची शुद्ध हरपली असताना थोडासा दिलासाही मिळाला आहे. आता बांध्यातले पाणी संपू नये याकरिता जेवढे रोपे लावून होतील तेवढे लावण्याचा प्रयत्न घाईगडबडीत केले जात आहेत. त्यामुळे श्री पद्धत कितीही लाभाची असली तरी शेतकरी दुर्लक्ष करीत आहेत.
बेरडीपारचे शेतकरी दिगंबर बिसेन, महादेव रिनाईत, गणेश कोल्हटकर, जयकुमार रिनाईत, धनराज पटले, डब्बेटोलाचे हेमराज पटले, हेमलाल रहांगडाले, चैतन पारधी, काचेवानीचे बयन कटरे, अली अहमद रहमान अली सैयद यांनी लोकमतला सांगितले की, श्री पद्धत ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे. कृषी सहायिका हर्षविना पठारे यांनी वारंवार भेटी देवून, रोवण्याच्या वेळी शेतावर येवून श्री पद्धतीने रोवण्या करावयास सांगितले. मात्र शेतात मजुरांची समस्या, पाण्याचा अभाव आणि रोवण्याला झालेला उशीर यामुळे श्री पद्धतीने रोहण्या करणे परवडण्यासारखे असल्याचे दिसून आले नाही.
श्री पद्धतीबद्दल कृषी सहायक आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाने जरी श्री पद्धत हिताची असली तरी ती परवडण्यासारखी नसल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले आहे. जयकुमार रिनाईत, रमेश कोल्हटकर आणि गणेश कोल्हटकर यांनी सांगितले की, काचेवानी क्षेत्राच्या कृषी सहायिका हर्षविणा पठारे शेतात येवून श्री पद्धत लागवडकरिता आग्रह धरुन दोरी तयार करुन दिल्या. मात्र शेतात तीन महिला मजूर रोवण्या करीत असल्याने तीन-चार ओळी लावून श्री पद्धत लावण्याचे बंद करण्यात आले.
अर्थात श्री पद्धत लावण्याकरिता मोकळे वातावरण आणि मजुरांच्या अभावाने श्री पद्धत आमच्या तरी हिताची नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)