शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’
By Admin | Updated: December 19, 2015 01:50 IST2015-12-19T01:50:15+5:302015-12-19T01:50:15+5:30
कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, बँकेचे कर्ज आणि सावकाराकडील गहाण या सर्वांची सांगड घालण्यासाठी ...

शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’
वनविभागाने केली थट्टा : एक एकरासाठी नुकसानभरपाई अडीच हजार रुपये!
अर्जुनी मोरगाव : कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, बँकेचे कर्ज आणि सावकाराकडील गहाण या सर्वांची सांगड घालण्यासाठी शेतकरी दिवसरात्र एक करुन शेतमळा फुलवतो. तीन महिन्यांने पीक हातात येईल आणि सदर प्रश्ने मार्गी लागतील, ही आस उराशी ठेवून प्रत्येक शेतकरी डोलणाऱ्या पिकाकडे मोठ्या मायेने बघतो. याच पिकावर संपूर्ण वर्षाचा ताळेबंद अवलंबून असतो. मात्र श्वापदांनी नुकसान केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून एकरामागे अडीच हजार रूपये देवून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.
काळ्यारात्री जंगली डुकरे पिकात शिरून पिकांची नासधूस करतात. हा प्रकार पाहून हतबल शेतकरी स्वप्न भंगले म्हणून टाहो फोडतो. मदतीसाठी सरकारी दफ्तरात उंबरठे झिजवितो. सरकारच आपले मायबाप हे ध्यानात घेऊन शेवटची आस म्हणून केवीलवाण्या नजरेने शासकीय मदतीची वाट बघतो. उशिरा का होईना मदत हाती लागते, मात्र तीसुद्धा तुटपूंजी आणि पुन्हा स्वप्न दुभंगतो. अशीच वास्तव दुर्दैवी घटना तालुक्यातील अरततोंडी-दाभना येथील वयोवृद्ध शेतकरी वासुदेव झिंगर राखडे यांच्याशी घडली.
वासुदेव राखडे यांनी दाभना येथील गट क्रमांक ३०७ मध्ये ०.७६ हे.आर.मध्ये धान पिकाची लागवड केली. सदर पिकात जंगली डुकरांनी प्रवेश करुन संपूर्णपणे नासधूस केल्याची तक्रार २९ सप्टेंबरला वनपरिक्षेत्राधिकाऱ्याकडे केली. नासधूस झालेल्या क्षेत्राचे छायाचित्र काढण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी तब्बल २९ छायाचित्रे तक्रार अर्जासोबत जोडले.
नियमाप्रमाणे १४ दिवसांच्या आत वनरक्षक, कृषी सहायक आणि तलाठी यांच्या तीन सदस्यीय समितीने ५ आॅक्टोबर रोजी घटनास्थळी जावून मौका पंचनामा करुन झालेल्या नुकसानीचा अहवाल वनपरिक्षेत्राधिकारी अर्जुनी मोरगाव यांना सादर केला. तपासी अधिकाऱ्यांनी ०.७६ हे.आर.पैकी ०.७३ हे.आर. मध्ये लागवड केलेल्या धान पिकामधून रानडुकरे गेल्याने त्यांच्या खुदबळीमुळे फक्त १.८० क्विंटल धान पिकाची नुकसान झाल्याचे अहवालामध्ये नोंदविले. प्रकाष्ट निष्कासन अधिकारी नवेगावबांध व्ही.जी. उदापुरे यांच्या ५ नोव्हेंबरच्या आदेशानुसार, शेतकरी राखडे यांनी मिळालेल्या पत्रात गट क्र. ३०७ मधील ०.७६ हे.आर.पैकी ०.७३ हे.आर. धानपिकातून रानडुकरे गेल्याने खुदवळीमुळे १.८० क्विंटल धानाचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई म्हणून दोन हजार ५३८ रूपयांचा ३ डिसेंबरच्या तारखेचा धनादेश वासुदेव राखडे यांना दिला गेला.
यावर सदर शेतकऱ्यांने हरकत घेतली. एक एकर मधील जवळपास १४ हजार रूपयांचे नुकसान झाले असूनही तपासी अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप लावला आहे. पंचनामा करतेवेळी नुकसान झालेल्या तब्बल २९ ठिकाणचे २९ फोटो ज्यांचा खर्च एक हजार ४५० रूपये झाला, मग फक्त १८० क्विंटल धानाचे नुकसान कसे शक्य आहे? असा सवाल राखडे यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकारामुळे पंचनामा करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका एकरातील नुकसान भरपाई फक्त अडीच हजार रूपये, हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर केंद्रात व राज्यात सत्तेत आलेली नवी सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा हा ज्वलंत उदाहरण आहे.
तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, भूमिपूत्र शेतकरी नेते आणि जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या या थट्टेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)