पूल नसल्याने शेतकऱ्यांची पायपीट

By Admin | Updated: July 18, 2014 00:09 IST2014-07-18T00:09:55+5:302014-07-18T00:09:55+5:30

खामखुरा ते माहुरकुडा या पांदण रस्त्यावरील नाल्यावर पुल नसल्याने दोन्ही गावातील शेतकऱ्यांना अर्धा कि.मी. अंतर कापण्यासाठी पाच कि.मी. पर्यंत पायपीट करावी लागते.

Farmer's footpath because there is no pool | पूल नसल्याने शेतकऱ्यांची पायपीट

पूल नसल्याने शेतकऱ्यांची पायपीट

दत्तक ग्राम योजना : विकास कामे झालीच नाही
संतोष बुकावन - अर्जुनी/मोर.
खामखुरा ते माहुरकुडा या पांदण रस्त्यावरील नाल्यावर पुल नसल्याने दोन्ही गावातील शेतकऱ्यांना अर्धा कि.मी. अंतर कापण्यासाठी पाच कि.मी. पर्यंत पायपीट करावी लागते. अनेकदा पाठपुरावा करूनही गावातील समस्यांचा निवेदनाला केराची टोपली दाखविली जाते अशी व्यथा खामखुरा येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली.
खामखुरा हे गाव अंधश्रध्देने पछाडलेले गाव म्हणून यावर्षी प्रकाशझोतात आले होते. हे गाव तत्पूर्वीच आ. राजकुमार बडोले यांच्या दत्तक ग्राम योजनेत आहे.या गावात अनेक समस्या आहेत. दत्तक ग्राम योजनेतील समस्यांचे आमदारांनी निराकरण केले नाही. खामखुरा हत्याकांडाचे वेळी आ. बडोले यांनी गावात भेट देणे अपेक्षित होते. ते जखमींना भेटण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे गेले मात्र त्यांनी गावात भेट देण्याचे सौजन्य बाळगले नाही अशी खंत सरपंच संजय राऊत यांनी व्यक्त केली.
खामखुरा या गावाची लोकसंख्या १९८४ आहे. शेती व शेतमजूरी हे रहिवाशांचे रोजगाराचे साधन आहे. या गावातील मजूरांना मग्रारोहयो अंतर्गत वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार मिळाला नाही. केवळ २ कुटूंबाना मिळाला आहे. या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंगणवाडी आहे. या अंगणवाडीनजीक विहीर आहे. या विहीरीतील पाणी दूषीत आहे. अंगणवाडीतील बालकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सुमारे २०० मीटर अंतरावरून बोअरवेलचे पाणी आणावे लागते. वर्षाच्या प्रारंभी आ. बडोले यांनी पंचायत समिती कार्यालयात पाणी टंचाई समस्येवर आढाव बैठक घेतली. त्यात सरपंच राऊत यांनी दोन बोअरवेलचा प्रस्ताव मांडला. मात्र या प्रस्तावावर अद्यापही विचारच केला गेला नाही. या गावात विठ्ठल रुखमाई मंदीराजवळ १.५० लक्ष रुपयाची चावडी बांधकाम हेच आमदार निधीतून प्राप्त झाले. आमदारांकडून या व्यतिरीक्त कुठलाही निधी गावाच्या विकासासाठी देण्यात आला नाही.
येथे जलस्वराज्य योजनेंतर्गत नळयोजना आहे. मात्र याव्दारे गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी गावकरी केवळ इतर कामासाठीच वापरतात. नळयोजना सुध्दा अनेकदा बंद असते. पाण्याचे स्त्रोत्र म्हणून या गावात मोठ्या पाणीटाकीची व सार्वजनिक विहीरींची आवश्यकता आहे. याठिकाणी प्राथमिक स्वास्थ उपकेंद्र नाही. क्षुल्लक उपचारासाठी ९ किमी अंतरावरील कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय होते. येथे उपकेंद्र देण्याची मागणी आहे. येथील विद्यार्थी सायकल व पायदळ शाळेत जातात. गावात वाचनालय नाही, वनजमिनीवरील अतिक्रमण धारकांना ज्यांची नव्याने मोजणी झाली त्यांना पट्टे मिळण्याची प्रतिक्षा आहे.
या गावाच्या दत्तक ग्राम समितीच्या अध्यक्ष शितल लाडे या आहेत. त्या भाजपच्या महिला पदाधिकारी आहत. ज्यावेळी दत्तक ग्राम योजना अस्तित्वात आली. त्यावेळी या ावातील २२ मागण्यांचे निवेदन आमदारांना देण्यात आले होते. यापैकी केवळ ३ समस्यांचे निराकरण करण्यात आले. रामदास दुनेदार ते हनुमान जनबंधू यांचे घरापर्यंत दलीतवस्ती रस्त्याच्या बांधकामाची मागणी होती. यापैकी १२० मीटर रस्त्याचे बांधकाम झाले. निधी नसल्यामुळे सुमारे २०० मीटर रस्त्याचे काम अद्याप झाले नाही. खामखुरा ते महागाव रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात बऱ्याचदा हा संपर्क तुटतो.
खडखडा तलावावर पाणघाटाची जुनी मागणी आहे. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आवारभिंत आवश्यक आहे. खामखुरा महागाव मार्गावर असलेल्या स्मशानघाटात बोअरवेलची आवश्यकता आहे. या ठिकाणी खामखुरा, हेटी, महागाव येथील पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जातात. उन्हाळ्यात या नाल्याला पाणी राहत नसल्याने या तीन गावातील लोकांची गैरसोय होते.

Web Title: Farmer's footpath because there is no pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.