आंदोलन करायला शेतकरी उतरले विहिरीत; अखेरीस पोलिसांनी काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 17:16 IST2021-08-30T17:12:24+5:302021-08-30T17:16:11+5:30
शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३० ऑगस्ट रोजी एक अनोखे आंदोलन केले.

आंदोलन करायला शेतकरी उतरले विहिरीत; अखेरीस पोलिसांनी काढले बाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे बांधकाम धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही सिंचन विहिरीचे अनुदान दिले नाही. शिवाय वीज जोडणी ही देण्यात आलेली नाही. संबंधित विभाग आणि शासनाला अनेकदा निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेण्यात आली नाही. ही समस्या मार्गी न लावल्याने सोमवारी (दि.३०) ऑगस्ट रोजी प्रहारचे कार्यकर्त्यांनी विहिरीत बसून आंदोलन केले आहे. (Farmers came down to the well to protest; Eventually the police pulled him out)
सालेकसा तालुक्याच्या भजेपार येथील चार शेतकरी तथा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विहीरीत बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे. भजेपार येथील प्रल्हाद बहेकार, टाईकराम ब्राम्हणकर, छगन बहेकार व रघुनाथ चुटे या चौघांनी सोमवारी सकाळी ७ वाजता विहिरीत बसून आंदोलन केले.
सालेकसा तालुक्यातील भजेपार येथील लाभार्थी शेतकरी यांच्या शेतात धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. भजेपार येथील लाभार्थी पुरुषोत्तम बहेकार व भाडीपार येथील अनंतराम गेडाम यांच्या शेतात योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. मात्र पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटूनही त्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली नाही. ज्या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्या विहिरींपर्यंत वीज जोडण्यात आली नाही. योजनेची रक्कम व वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी अनेकदा संबंधित विभागाकडे करण्यात आली. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
त्यामुळे सोमवारी या चार शेतकऱ्यांनी विहिरीत बसून आंदोलन केले. याची मािहती मिळताच लघु पाटबंधारे जिल्हा परिषद गोंदियाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी व सालेकसाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सालेकसाचे ठाणेदार राऊत व त्यांच्या पोलिसांनी या शेतकऱ्यांना शेततातील विहिरीतून बाहेर काढले.