तलाठ्याच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित
By Admin | Updated: May 11, 2014 00:24 IST2014-05-11T00:24:36+5:302014-05-11T00:24:36+5:30
जून-जुलै २०१३ मध्ये तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकर्यांना शासकीय मदत जाहीर केली.

तलाठ्याच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित
तिरोडा : जून-जुलै २०१३ मध्ये तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकर्यांना शासकीय मदत जाहीर केली. मात्र अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. मदतीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांचे खाते क्रमांक तहसीलदार तिरोडा यांच्याकडे देणे आवश्यक होते. परंतु गराडा येथील तलाठ्याने व तालुक्यातील इतर ठिकाणच्या तलाठ्याने अनेक शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक घेतलेच नाही. काहींनी खाते क्रमांक दिले. परंतु त्याची यादीत नोंद नाही. कित्येक ठिकाणी चुकीचे खाते क्रमांक नोंद करून आपल्या मागची बला काढून टाकली. त्यामुळे शासनाची आर्थिक मदत कित्येक शेतकर्यांपर्यंत पोहोचलीच नाही. शासकीय मदत शेतकर्यांना पोहचावी यासाठी त्यांचे खाते क्रमांक असलेली यादी तलाठ्यांमार्फत मागविण्यात आली. ज्यांचे खाते क्रमांक मिळाले नाही. त्याबाबत मंडळ अधिकारी तिरोडा, परसवाडा, मुंडीकोटा, वडेगाव, ठाणेगाव यांना तहसीलदार तिरोडा यांचेकडून पत्र पाठविण्यात आले. पत्र क्र.कलि/कानुनगो/कावि/२०५/२०१४ तहसीलदार तिरोडा यांचे कार्यालय दिनांक २१/४/२०१४ मध्ये नमूद केल्यानुसार सन २०११-१२ टंचाई मदत, जून-जुलै २०१३ व आॅगस्ट-सप्टेंबर २०१३ शेतकर्यांना मदत वाटप बाबत, खाते प्राप्त न झाल्याने समर्पित करण्यात आलेली रक्कम पुनच्छ शेतकर्यांच्या खात्यात जमा करायचे असल्यामुळे खाते क्रमांक गोळा करून माहिती तत्काळ देणेबाबत यापूर्वीसुध्दा सूचना देण्यात आल्या होत्या. ग्राम पंचायतच्या ठरावासह शेतकर्यांना माहिती सादर करण्यास कळविले होते. जे शेतकरी गावात राहत नसतील किंवा त्यांचे खाते अजूनपर्यंत बँकेत उघडले नसतील अशा शेतकर्यांची प्रत्यक्ष गृहभेट घेऊन खाते क्रमांक ३ दिवसाच्या आत जमा करण्यास सांगितले. खाते गोळा करताना अचूक बँक निहाय शाखेच्या पत्त्यासह आपल्याच जिल्ह्यातील बँकेचे खाते क्रमांक घ्यावे. सोबत मंडळ निहाय गावाच्या याद्या तिन्ही टप्याच्या पत्रासोबत जोडण्यात याव्यात, असे स्पष्ट नमूद असताना गराडा येथील तलाठी डी.एफ. नागदेवे यांनी काही शेतकर्यांचे बँक खाते क्रमांकाची यादीत नोंद न केल्याने त्या शेतकर्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. तलाठ्याकडे खाते क्र. जमा करताना तलाठ्यांने गांभीर्याने लक्ष दिले नाही. काहींनी खाते क्रमांक चिठ्ठीवर लिहून दिले ती चिठ्ठी कार्यालयातच हरवली. दुसर्या व्यक्तीकडे किंवा स्वत: नोंद काळजीपूर्वक न केल्याने खाते क्रमांकातील आकडे चुकीचे देण्यात आले. काहीचे चुकीचे खाते क्रमांक देवून पुढे ढकलण्यात आले. पर्यायाने बँकेत पैसे गेले परंतु खाते क्रमांक चुकीचे असल्याने तहसीलदार तिरोडा यांचेकडे रुपये हे चुकीच्या खाते क्रमांकाचे येत आहेत असे बँकेने कळविले. तहसीलदार तिरोडा यांच्या पत्राची अवहेलना करून खाते क्रमांक कार्यालयापर्यंत न पोहोचविणार्या संबंधित तलाठी व मंडळ अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी व तत्काळ शेतकर्यांचे खाते क्रमांक देऊन शेतकर्यांच्या खात्यावर शासकीय मदत देण्यात यावी. याकडे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी तिरोडा तालुक्यातील जनतेची आहे. याबाबत काही शेतकर्यांनी तहसीलदार तिरोडा यांचेकडे विनंती अर्ज सादर केला आहे. त्या अर्जाची प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी यांचेकडेही सादर करण्यात आलेली आहे. या पत्रावर संबंधित अधिकारी कोणती कारवाई करतात की आपल्या कर्मचार्यांच्या कृत्यांवर पांघरून घालतात याकडेही परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)