५२ क्विटंल धानाची कवडीही न मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST2021-04-21T04:29:14+5:302021-04-21T04:29:14+5:30
गाेंदिया : शेतकऱ्यांच्या धानाला भाव देण्यात यावा यासाठी शासनाने हमीभाव जाहीर केला, सोबतच खरिपाच्या धानाला बोनसही जाहीर केला. त्यामुळे ...

५२ क्विटंल धानाची कवडीही न मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा ()
गाेंदिया : शेतकऱ्यांच्या धानाला भाव देण्यात यावा यासाठी शासनाने हमीभाव जाहीर केला, सोबतच खरिपाच्या धानाला बोनसही जाहीर केला. त्यामुळे बोनसच्या लालसेपायी सहकारी संस्थेत धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला सहकारी धान गिरणीतच कसे गंडविण्यात आले. सालेकसाच्या धान गिरणीतील या प्रकारामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने आता आत्महत्येचा इशारा दिला आहे. मला माझ्या धानाचे पैसे न मिळाल्यास आत्महत्या करील, असा इशारा भजेपार येथील शेतकरी पुरुषोत्तम श्रीराम बहेकार यांनी दिला आहे.
खरिपाच्या धानाला शासनाचा बोनस मिळेल म्हणून भजेपार येथील शेतकरी पुरुषोत्तम श्रीराम बहेकार यांनी सालेकसा येथील सहकारी भात गिरणीवर ५० क्विंटल ६० किलो धान २१ जानेवारी २०२१ रोजी विक्री केले. त्या विक्री केलेल्या धानाची पावती त्यांना देण्यात आली नाही. तुम्हाला पावती देण्याची काही गरज नाही तुमची नोंदणी आम्ही करतो तुमच्या बँक खात्यावर पैसे येतील घरी जा, असे सांगण्यात आले. त्यावर ते घरी आले. यासंदर्भात बहेकार यांनी वारंवार संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आज करू, उद्या करू अशी टाळाटाळ करून ३१ मार्च काढला; परंतु २१ जानेवारीला खरेदी करण्यात आलेल्या धानाची नोंदणी ३१ मार्च होऊनही पेमेंट करण्यात आले नाही. बहेकार यांना त्यांच्या हक्काचे पैसे न देणाऱ्या संस्थेमुळे त्यांना मनस्ताप आला आणि त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे धाव घेतली. तरीही पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. मला माझ्या हक्काचे पैसे न दिल्यास आत्महत्या करील, असा इशारा त्या शेतकऱ्याने दिला आहे.
कोट
आलेल्या तक्रारीवरून सदर संस्थेला पत्र दिले आहे; परंतु ज्या व्यक्तीला पत्र दिले ती व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे सध्या या प्रकरणाचा अपडेट देता येणार नाही. कोविडमुक्त होऊन परतल्यावरच त्या प्रकरणाची शहानिशा करून सदर शेतकऱ्याला न्याय देता येईल.
-जी.बी. पाटील जिल्हा मार्केटिंग अधिकारी