शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: April 30, 2015 01:05 IST2015-04-30T01:05:05+5:302015-04-30T01:05:05+5:30
तिरोडा तालुक्यात मागील महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले.

शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यात मागील महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले. रोगराई धानावर लागली, त्यातच गहू, चना, तूर, पोपट, उडीद, जवस यांची हातात आलेली पिके नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वे तलाठी, सचिव व कृषी सहायक यांच्याकडून करण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांचे बँकेत खाते नव्हते. अशा शेतकऱ्यांनी बँकेत खाते उघडले व तलाठी तसेच सचिव यांना खाते नंबर दिले. शेतकरी मोठ्या आशेने बँकेत पैसा जमा झाला असेल अशी वाट बघत असतात. पण पैशांचा पत्ताच नाही.
सन २०१४ मध्ये एका पाण्यासाठी शेतकऱ्यांचे धान गेले. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची अथवा विद्युत पंपाची व्यवस्था होती, अशा शेतकऱ्यांनी थोडेफार धान पिक घेतले. पण अनेक शेतकरी निसर्गावर अवलंबून असतात त्यांचे काय? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जो दिवस असतो तो दिवस शेतकऱ्यांसाठी सारखाच असतो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकरी पाहत आहेत. दिवसभर काबाडकष्ट करुन शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळत नाही. नेहमीच या पोटासाठी कष्ट करुन उपाशी पोटी शेतकरी जीवन जगत असतो, ही फार दुर्देवी बाब असून मात्र उपाय नाही.
शेती हा परवडण्यासाखा व्यवसाय राहिला नाही. पण वडिलांची परंपरा सुरु ठेवावी लागते, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. रासायनिक खते, औषधे, मजूर यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. पण शेतकऱ्यांनी धान्य कितीही पिकवून त्याच्या मालाला भाव नाही. अशी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. शेतकरी आपले धान्य वाटेल त्या भावाने विकत असतात. तर व्यापारी कमी दराने धान विकत घेवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असतात. पण खर्चासाठी शेतकऱ्यांना धान विकणे गरजेचे असते. निसर्ग कोपल्यामुळे शेतकरी बैचेन दिसत आहे. पण अशावेळी शेतकऱ्यांचा वाली कोणीही दिसत नाही. (वार्ताहर)