राज्य परिवहन मंडळाने पुन्हा वाढविले प्रवासभाडे
By Admin | Updated: June 2, 2014 01:25 IST2014-06-02T01:25:16+5:302014-06-02T01:25:16+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा प्रवास भाड्यात वाढ केली आहे.

राज्य परिवहन मंडळाने पुन्हा वाढविले प्रवासभाडे
गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा प्रवास भाड्यात वाढ केली आहे. हे नवीन प्रवास भाडे ३१ मेच्या रात्री १२ वाजताच्या नंतरपासून लागू करण्यात आले आहे. परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा वाढविलेल्या प्रवास भाड्याचे कारण म्हणजे डीझेलच्या किंमतीत झालेली वाढ, टायरच्या वाढलेल्या किंमती व एसटीच्या कर्मचार्यांची करण्यात आलेली १0 टक्के वेतन वाढ, अशी आहेत. या प्रवास दरवाढीचा प्रभाव साधारण व जलद बसमधील प्रवाशांवर कमी पडेल. मात्र एशियाडमध्ये प्रवास करणार्यांना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. आधी सहा किमी. वर साधारण व जलद बसची सेवा घेणार्या प्रवाशांना ६.0५ रूपये भाडे द्यावे लागत होते. आता ६.२0 रूपये भाडे द्यावे लागेल. एशियाडच्या प्रवाशांना पूर्वी सहा किमी.वर ८.२0 रुपये शुल्क लागत होते. आता त्यांना ८.४५ रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. अशाप्रकारे साधारण व जलद बस सेवेसाठी प्रवाशांना केवळ १५ पैसे शुल्क वाढविण्यात आले आहे. तर एशियाडच्या प्रवाशांना २५ पैसे अधिकचे द्यावे लागणार आहेत. ‘ कोठून किती लागणार भाडे? गोंदिया आगारातून मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया ते तिरोडा, तुमसर, आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव व रजेगावसाठी केवळ १-१ रूपयाची वाढ तिकीट दरात करण्यात आली आहे. तिरोड्यासाठी पूर्वी ३0 रूपये, आता ३१ रूपये. तुमसरसाठी पूर्वी ६१ रूपये, आता ६२ रूपये. आमगावसाठी पूर्वी ३६ रूपये, आता ३७ रूपये, सालेकसासाठी पूर्वी ४९ रूपये, आता ५0 रूपये. देवरीसाठी पूर्वी ६६ रूपये, आता ६७ रूपये. गोरेगावसाठी पूर्वी १८ रूपये, आता १९ रूपये. साकोलीसाठी पूर्वी ६७ रूपये, आता ६८ रूपये प्रवास भाडे राहणार आहे. गोंदिया ते भंडार्यासाठी पूर्वी १0८ रूपये भाडे घेतले जात होते. आता ११२ रूपये घेण्यात येतील. गोंदिया ते नागपूरसाठी १६९ रूपये घेतले जात होते, आता १७४ रूपये घेतले जातील. गोंदिया ते रजेगावच्या सीमेपर्यंत पूर्वीपेक्षा एक रूपया अधिक घेण्यात येईल. तिरोडा आगाराचे व्यवस्थापक एम.डी. नेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण बससाठी तिरोडा-गोंदियासाठी पूर्वी ३0 रूपये भाडे होते. आता एक रूपया वाढ झाली आहे. तिरोडा ते तुमसर व भंडार्यासाठीसुद्धा एक-एक रूपया दरवाढ करण्यात आली आहे.