पाकिस्तानातून नेपाळ मार्गाने आल्या नकली नोटा
By Admin | Updated: July 21, 2014 00:14 IST2014-07-21T00:14:54+5:302014-07-21T00:14:54+5:30
नकली नोटा चलनात आणणाऱ्या राज्यस्तरीय टोळीतील आमगावच्या दोन व्यापाऱ्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ७५ नोटा जप्त केल्या आहेत.

पाकिस्तानातून नेपाळ मार्गाने आल्या नकली नोटा
आरोपींना एमसीआर : १ कोटी २० लाख रुपयांच्या नोटा बाजारात?
गोंदिया : नकली नोटा चलनात आणणाऱ्या राज्यस्तरीय टोळीतील आमगावच्या दोन व्यापाऱ्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ७५ नोटा जप्त केल्या आहेत. या आरोपींची पीसीआरनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. नकली नोटा पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आणल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शिवाय सव्वा कोटींच्या नोटा या टोळीमार्फत बाजारात पसरल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आमगाव येथील नैवेद्यम रेस्टॉरेंटचे मालक प्रल्हाद सुरेशप्रसाद दुबे (५०) व नवीन कृष्णकुमार असाटी (२६), दोघेही रा.आमगाव या दोघांनी मागील अनेक दिवसांपासून नकली नोटा चलनात आणण्याचा व्यवसाय सुरु केला होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. आमगाव पोलिसांनी ५ जुलैच्या सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सापळा रचून येथील बाजार चावडी येथे त्या दोघांना संशयास्पद हालचाली करताना पकडले. त्यांची अंगझडती घेतल्यावर दोघांजवळून ५०० रुपयांच्या ३४ नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या. त्यात प्रल्हाद दुबेजवळ ११ नोटा (सिरीज क्रमांक ५ डीडी ५९८७८८) व ९ नोटा (सिरीज क्रमांक ९ बीके ९७६६५९) या एकाच सिरीजच्या आढळल्या तर नवीन असाटी याच्याकडे असलेल्या १४ नोटांपैकी ८ नोटा (५ डीडी ५९८७८८), ३ नोटा (९ बीके ९७६६५९) व ६ नोटा (४ एचजी ५८६३७४) या सिरीजच्या आहेत. १७ हजार रुपयांच्या ३४ नकली नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या. त्यांनतर दुबे यांच्या घराची चौकशी केल्यावर त्यांच्या घरून ४१ नोटा नकली मिळाल्या. या प्रकरणात अकोला येथे पकडण्यात आलेल्या आरोपींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
अकोला येथील आरोपींनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. त्यांना जामीन मिळाल्यावर आमगाव पोलीस अटक करतील. जामीन फेटाळल्यास पोलिसांकडून या आरोपींना मागविण्यात येणार आहे. न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केल्याने त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
आमगाव पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत भंडारा येथील तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. आमगावात आलेल्या ५०० रुपयांच्या नकली नोटा पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आणल्याची विश्वसनीय माहिती आहे.
५०० रूपयांच्या नकली नोटा एक कोटी २० लाख रूपये केवळ २२ लाखात आणल्याचीही चर्चा आहे. या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ४८९ ब, ४८९ क, १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आणखी कुणी या टोळीत तर नाही ना याचा शोध आमगाव पोलीस घेत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)