कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे होतोेय कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:27+5:30
कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणी केले जातात. शिवाय कोरोना बाधित रुग्णाचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपीड अँटीजेन चाचण्या होत आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तर १ ते ६ सप्टेंबर दरम्यान तब्बल ८२१ कोरोना बाधित आढळले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणाचे सध्याचे नियोजन मात्र, कमी पडत आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे होतोेय कानाडोळा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांचे स्वॅब नमुने घेवून तपासणी करण्याकडे आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढ होत असून सातत्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जर वेळीच केले तर बऱ्याच प्रमाणात कोरोनाला प्रतिबंध लावण्यात यश येवू शकते.
कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणी केले जातात. शिवाय कोरोना बाधित रुग्णाचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपीड अँटीजेन चाचण्या होत आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तर १ ते ६ सप्टेंबर दरम्यान तब्बल ८२१ कोरोना बाधित आढळले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणाचे सध्याचे नियोजन मात्र, कमी पडत आहे. त्याला अपुरे मनुष्यबळ व आरोग्य यंत्रणेवर दोन महिन्यात वाढलेला ताण हे कारण असले तरी कोरोना संसर्ग काळात या बाबी लक्षात घेता, यात दिरंगाई करुनही चालणार नाही. सर्व आजारांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक वेगाने होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेवढ्याच जलद गतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. यासाठी अंमलबजावणी यंत्रणांमध्ये समन्वय असावा. ज्या भागात रुग्णांची नोंद झाली त्या भागातील आरोग्य केंद्राद्वारे त्वरित उपाययोजना होणे, हायरिस्क रुग्णांशी संवाद साधून त्यांना स्वॅब देण्यासाठी पाठविणे, प्रसंगी केंद्रावर घेवून जाणे महत्वाचे आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेत समन्वय असणे महत्त्वाचे आहे. मात्र जिल्ह्यातील सध्या स्थिती पाहता त्याचा अभाव आहे.
तपासणी पथके गठीत करुन मोकळे
कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने १५० वर विशेष तपासणी पथके तयार करुन त्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. मात्र यापैकी किती पथके नियमित जावून नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. यावर सुध्दा प्रश्न चिन्ह आहे.
अनेकजण टाळतात टेस्ट?
कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट कराव्या असे बंधन आहे. खासगी कार्यालये, प्रतिष्ठानांमधील अनेकांनी मात्र या टेस्टला बगल दिली. अशा व्यक्ती कोरोनाचा प्रसार करु शकतात. त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याची तरतूद आहे. मात्र प्रशासन कठोर कारवाई करीत नसल्यामुळे असे अनेक कोरोना वाहक शहरात,जिल्ह्यात फिरत आहेत. याला आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार देखील काही प्रमाणात कारणीभूत आहे.
रुग्णांबाबत यंत्रणा बेफिकीर
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने गंभीर नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांना गृह विलगिकरणात ठेवले जात आहे. या रुग्णांना १८ दिवस सक्तीने एकाच खोलीत राहावे लागते. या रुग्णांचा खोलीचा दरवाजा सील करावा. त्यांच्या घराला याविषयीचे बोर्ड लावावे. यासह अन्य महत्वाचे निर्देश आहेत. मात्र अशा संक्रमित व्यक्तींच्या घराला बोर्ड लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या रुग्णांविषयी परिसरातील नागरिक अनभिज्ञ आहेत. होम विलगिकरणातील पॉझिटिव्ह रुग्ण चक्क बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.