ेसत्ताधाऱ्यांचे अपयश जनतेपर्यंत पोहोचवा
By Admin | Updated: December 29, 2014 23:45 IST2014-12-29T23:45:20+5:302014-12-29T23:45:20+5:30
केंद्रात व राज्यात आपली सत्ता नाही. परंतु कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्षाची कामे करत रहावी व निवडणुकीच्यावेळी विरोधकांनी दाखविलेल्या ‘अच्छे दिन’चे स्वप्न पुर्ण होताहेत काय,

ेसत्ताधाऱ्यांचे अपयश जनतेपर्यंत पोहोचवा
पटेलांचे आवाहन : जिल्हा कार्यकर्ता बैठकीला मार्गदर्शन
गोंदिया : केंद्रात व राज्यात आपली सत्ता नाही. परंतु कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्षाची कामे करत रहावी व निवडणुकीच्यावेळी विरोधकांनी दाखविलेल्या ‘अच्छे दिन’चे स्वप्न पुर्ण होताहेत काय, काळा पैसा परत आणून जनतेच्या खात्यात जमा झाला का, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना करून त्यांची नामुष्की जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. येथील विशाल लॉनमध्ये पक्षाच्या वतीने नुकतीच कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रफुल्ल पटेल होते. यावेळी आमदार राजेंद्र जैन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, भंडारा जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, देवेंद्रनाथ चौबे, विजय राणे, गंगाधर परशुरामकर, रमेश ताराम, अशोक गुप्ता, मनोहर चंद्रीकापुरे, कुंदन कटारे, शिव शर्मा, दामोदर अग्रवाल, अशोक शहारे, जगदिश बहेकार, नरेंद्र तुरकर आदी उपस्थित होते.
पक्ष मागील अनेक वर्षापासून सत्तेवर असल्याने कार्यकर्त्यांना विरोध कसा करावा याची माहिती नाही. निवडणुका येतात व जातात. कार्यकर्त्यांनी परिसरातील जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात व सत्ताधाऱ्यांच्या समक्ष विविध मुद्दे उचलून धरले पाहिजे. मागण्या पूर्ण करून घेतल्या पाहिजे. यातून पक्ष मोठा होईल व नवीन कार्यकर्ते जोडले जातील, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन बबलू कटरे यांनी केले तर आभार शिव शर्मा यांनी मानले.
कृषी अधिकाऱ्याची मागणी
मुंडीकोटा : या गावी कृषी मंडळ कार्यालय आहे. पण मागील एक वर्षापासून कृषी मंडळ अधिकारी नाही. याठिकाणी अधिकारी होते. पण त्यांची बदली झाल्यामुळे या ठिकाणी नवीन अधिकारी रुजू झालेच नाही. तसेच या कार्यालयात एक कृषी पर्यवेक्षक होते, पण ते सेवानिवृत्त झालेत. पण ती जागा रिक्त पडलेली आहे. त्यामुळे या कार्यालयात एकच कृषी पर्यवेक्षक व ११ कृषी सहायक कार्यरत आहेत. एकच कृषी पर्यवेक्षक असल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. या ठिकाणी अधिकारी नसल्यामुळे या कार्यातील सर्वच कर्मचारी बाहेर गावावरून ये-जा करतात. तिरोडा येथे सभा असल्यास सर्वच कर्मचारी जातात.