मालगुजारी तलावांचे अस्तित्व धोक्यात

By Admin | Updated: November 1, 2015 02:10 IST2015-11-01T02:10:48+5:302015-11-01T02:10:48+5:30

जलसंकटातून मुक्त होण्यासाठी एकीकडे राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या नियंत्रणात ..

The existence of Malgujari ponds threatens existence | मालगुजारी तलावांचे अस्तित्व धोक्यात

मालगुजारी तलावांचे अस्तित्व धोक्यात

देवानंद शहारे ल्ल गोंदिया
जलसंकटातून मुक्त होण्यासाठी एकीकडे राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या नियंत्रणात असलेल्या काही जुन्या तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कधीकाळी बाराही महिने भरून राहणारे तलाव आता केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अनेक तलाव गायब झाले आहेत. केवळ दोन मालगुजारी तलावांना सोडले तर कोणत्याही तलावांत ०.५ दलघमीपेक्षा जास्त पाणी नाही.
जिल्ह्यात १०० वर्षे जुने मालगुजारी तलाव आहेत. त्यामुळेच हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलाव मातीने भरण्यासोबतच अतिक्रमणाच्या समस्येमुळे या प्राचीन वारस्याचे अस्तित्व संकटात दिसून येत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या कायम वादग्रस्त राहिलेल्या या विभागाकडून त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
जिल्ह्यात सहा हजार ९०५ तलाव, बांध आहेत. एकूण जलक्षेत्र २१ हजार ५०९ हेक्टर आहे. सिंचन विभागाच्या ६८ तलावांचे जलक्षेत्र ११ हजार हेक्टरच्या जवळपास आहे, तर जिल्हा परिषदेच्या एक हजार ०८७ तलावांचे जलक्षेत्र चार हजार ६५४ हेक्टर आहे. याशिवाय ८८ खासगी व पाच बचत गटांचे तलाव आहेत. जिल्हा परिषदेकडून लक्ष देण्यात न आल्यामुळे तलावांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बांध तसेच तलाव एकतर मातीने भरण्यात आले किंवा अतिक्रमण करण्यात आले किंवा वाळलेले आहेत.
जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमधील बोडी व तलाव मातीने बुजवून सपाट करण्यात आले. यानंतर तेथे प्लॉट पाडून त्यांची विक्रीसुद्धा करण्यात आली. त्यावर आता अनेक मानवी वसाहती तयार झाल्या असून मोठमोठ्या इमारती मोठ्या दिमाखात उभ्या आहेत.
मागील २० वर्षांपूर्वी तिरोडा शहरात असणारे दोन तलाव असेच गायब झाले. त्यावर आता मोठ्या इमारती उभ्या असून नागरी वसाहती आहेत. तलाव लुप्त होण्यामागील हेसुद्धा एक प्रमुख कारण आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

तलावांवर वाढतेय अतिक्रमण
प्राचीन मालगुजारी तलावांकडे लक्ष न दिल्यामुळे तलावांची जलक्षमता कमी झालेली आहे. मातीने भरल्यामुळे खोली कमी झाली आहे. जिल्ह्यात जवळपास ६० टक्के तलाव असे आहेत, जे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर विसंबून आहेत. अनेक तलाव तर पूर्णत: बुजून गेले व त्यांच्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही वर्षांत मालगुजारी तलावांचे अस्तित्वच नष्ट होईल.
कालीसरारमध्ये केवळ १.६७ टक्के पाणी
जिल्ह्यातील मोठ्या तलावांपैकी (बांध) कालीसरारमध्ये केवळ ०.४६ दलघमी (१.६७ टक्के) उपयुक्त पाणी आहे. पुजारीटोला बांधाची स्थिती चांगली समजली जावू शकते. त्यात २६.७४ दलघमी (६१.४३ टक्के) पाणी आहे. शिरपूर जलाशयात ७३.१२ दलघमी (४५.७६ टक्के) व इटियाडोह जलाशयात ६३.७१ दलघमी (१९.९८ टक्के) पाणी आहे.
कृषी व मत्स्य व्यवसाय होणार प्रभावित
घटणारे बांध व कमी होणारा जलस्तर यांचा प्रभाव मत्स्यपालन व शेतीवरसुद्धा होईल. मात्र मत्स्यपालन विभागाने मत्स्य उत्पादनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होण्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लहान तलावांतून होणाऱ्या मत्स्य व्यवसायाची भरपाई मोठ्या जलाशयांतून करता येऊ शकते. तसेच कृषी विभागाद्वारे यावर्षी रबी पिकांसाठी ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु बांधांमध्ये जेव्हा अपेक्षित पाणी नसेल तर पिकांना भरपूर पाणी मिळणे शक्य नाही. अशात यावर्षी रबी पिकांच्या उत्पादनातही घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The existence of Malgujari ponds threatens existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.