आरोग्य कर्मचाऱ्यांचा आढावा सभेवर बहिष्कार
By Admin | Updated: February 3, 2015 22:58 IST2015-02-03T22:58:29+5:302015-02-03T22:58:29+5:30
सालेकसा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांचा प्रभार काढून घेण्याविषयी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व आरोग्य संचालक मुंबई व उपसंचालक

आरोग्य कर्मचाऱ्यांचा आढावा सभेवर बहिष्कार
गोंदिया : सालेकसा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांचा प्रभार काढून घेण्याविषयी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व आरोग्य संचालक मुंबई व उपसंचालक नागपूर यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांचा प्रभार काढण्यात न आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी ३० जानेवारीच्या आढावा सभेवर बहिष्कार घातला.
निवेदनानुसार, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनंतवार यांची बिजेपार, सातगाव व दर्रेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी १० आॅक्टोबर २०१४ रोजी तक्रार केली होती. यानंतर ८ डिसेंबर २०१४ रोजी त्यांचा पदभार काढून त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना केली होती. मात्र त्यांचा पदभार काढण्यात न आल्याने ३० जानेवारीच्या आढावा सभेवर बहिष्कार घालण्यात आला. तसेच जोपर्यंत डॉ. अनंतवार अतिरीक्त कार्यभार काढण्यात येत नाही, तोपर्यंत आढावा सभेवर बहिष्कार असेल, असे बिजेपार, सातगाव व दर्रेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांनी कळविले आहे. तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा अनंतवार यांची तक्रार केली होती.
मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी व अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी हे डॉ. अनंतवार यांचा बचाव करीत असल्याचा आरोपही सदर कर्मचाऱ्यांनी केला आहे.
डॉ. विवेक अनंतवार यांचा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा पदभार त्वरित काढून दुसऱ्या अधिकाऱ्यांना पदभार सोपविण्यात यावे, अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)