उपाययोजना सोडून होर्डिंगबाजीवर भर
By Admin | Updated: September 1, 2014 23:41 IST2014-09-01T23:41:32+5:302014-09-01T23:41:32+5:30
संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने थैमान घालून आरोग्य व्यवस्थेच्या नाकीनऊ आणले आहे. यावर आळा घालण्यासाठी आरोग्य व हिवताप विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र शहराची जबाबदारी

उपाययोजना सोडून होर्डिंगबाजीवर भर
गोंदिया : संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने थैमान घालून आरोग्य व्यवस्थेच्या नाकीनऊ आणले आहे. यावर आळा घालण्यासाठी आरोग्य व हिवताप विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र शहराची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेने वेगळीच शक्कल लढवून आपली जबाबदारी चक्क शहरवासीयांवरच ढकलली आहे. पालिका प्रशासन स्वत: करावयाच्या उपाययोजना सोडून शहरवासीयांना डेंग्यू व मलेरियावरील उपायांची माहिती देत स्वत:ची काळजी स्वत:च घेण्याचा सल्ला देत आहे. यासाठी शहरात जागोजागी होंर्डींग्सबाजी केली जात असल्याचे दिसून येत आहे.
डासांपासून पसरणारे आजार जीवघेणे ठरत आहेत. त्यात जिल्हा सध्या डेंग्यू व मलेरियाच्या विळख्यात आल्याचे चित्र आहे. झपाट्याने पसरलेल्या या डासांच्या आजारांवरून आरोग्य व हिवताप विभाग किती तत्परतेने आपले कर्तव्य पार पाडत आहे याची प्रचिती येते. ग्रामीण विभागात हिवताप विभाग स्वत: उपाययोजना करते. तर शहराची जबाबदारी मात्र नगर पालिकेकडे असते. यामुळे डासांवर उपाययोजना करणे हे पालिकेचे कर्तव्य आहे.
विशेष म्हणजे शहरातही डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण आढळून येत आहे. यातून पालिका प्रशासनाची कर्तव्यतत्परता उघडकीस येते. अशा परिस्थितीत पालिकेने कंबर कसून आलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी लढण्याची गरज आहे. मात्र पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व सदस्य फक्त बांधकाम विभागापुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येते. अशा या गंभीर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पालिके कडे साहित्याचा अभाव आहे. मात्र हे सर्व बोलून दाखविणे शक्य नसल्याने यावर पालिकेने नवी शक्कल लढविली आहे.
त्याचे असे की, आपली जबाबदारी पार पाडण्यास सपशेल अपयशी ठरत असलेल्या पालिकेने आता शहरवासीयांवरच जबाबदारीचे खापर फोडले आहे. यासाठी पालिकेने एक केविलवाना प्रयोग केला आहे. पालिकेने शहरात जागोजागी डेंग्यू व मलेरियाबाबत माहिती, त्यावरील उपचार, लक्षणे व घ्यावयाची काळजी आदी महिती असलेले फलक लावले आहेत. एवढेच नव्हे तर गरज पडल्यास शासकीय रूग्णालयात जाण्याचा अतिमहत्वाचा सल्लाही होर्डीग्समधून देण्यास पालिका प्रशासन विसरलेले नाही.
या होर्डीग्सबाजीवर करण्यात आलेल्या खर्चाच्या रकमेतून फवारणी व कीटकनाशक टाकण्यासारखे काम जोमाने करण्याची गरज होती. पालिकेकडे एकच फॉगिंग मशिन असल्याने आणखी मशीन खरेदी करण्याची गरज होती. मात्र हे सर्व उपाय करण्याचे सोडून पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी होर्डीग्सला प्राधान्य दिले. यातून येथील पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व सदस्य शहरवासीयांचे किती हित जोपासत आहेत याची प्रचिती येते. (शहर प्रतिनिधी)