साधेपणातही जल्लोषात बाप्पाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:34+5:30
कोरोनाने अवघ्या जगाला हेलावून सोडले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अवघ्या देशालाच लॉकडाऊन करण्याची पाळी आली होती. यामुळे मात्र देशाची अर्थव्यवस्थाही विस्कटून गेली व त्यात राज्याचाही समावेश आहे. अशात राज्य शासनाने आता अनलॉकींगची प्रक्रीया सुरू केली असून विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

साधेपणातही जल्लोषात बाप्पाचे आगमन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार, खासगीच नव्हे तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणातही जल्लोषात बाप्पाचे स्वागत केले. आतापर्यंत गणरायाच्या स्वागतप्रसंगी निघणाऱ्या मिरवणुका व डिजे-बँडचा गजर मात्र कानी पडला नाही.
कोरोनाने अवघ्या जगाला हेलावून सोडले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अवघ्या देशालाच लॉकडाऊन करण्याची पाळी आली होती. यामुळे मात्र देशाची अर्थव्यवस्थाही विस्कटून गेली व त्यात राज्याचाही समावेश आहे. अशात राज्य शासनाने आता अनलॉकींगची प्रक्रीया सुरू केली असून विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजतरी कोरोनावर औषध नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, गर्दी टाळणे याच उपाययोजनांवर जोर दिला जात आहे. मात्र सण व उत्सवांत नागरिकांना याचे भान राहत नसल्याने शासनाने नियंत्रणासाठी दिशा-निर्देश दिले आहेत. त्यानुसार, सर्वच सण व उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत.
गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असून शासनाच्या निर्देशांनुसार शनिवारी (दि.२२) साधेपणानेच मात्र तेवढ्याच जल्लोषात बाप्पाचे आगमन झाले. मात्र आतापर्यंत गणरायाच्या आगमनानिमित्त निघणाºया मिरवणुका तसेच डिजे-बँडचा गजर कानी पडला नाही. मोठमोठाल्या मंडळांनीही भकपेबाजी टाळत अत्यंत साधेपणाने बाप्पाला आणून स्थापना केल्याचे दिसले. लाकड्या गणरायाचे आमगन होणार असल्याने मंडळांचे कार्यकर्तेच नव्हे तर घरी स्थापना करण्यासाठी कित्येक कुटुंबीयांची मूर्तीकारांकडे गेल्या ८ दिवसांपासून गर्दी दिसून येत होती. यातून यंदाच्या उत्सवात साधेपणा दिसला असतानाच उत्साहात मात्र किंचितही कमी जाणवून आली नाही.
कित्येक वर्षांची परंपरा जोपासली
शहरातील काही मोठ्या मंडळाची मागील कित्येक वर्षांपासूनची गणेशोत्सवाची परंपरा चालत आलेली आहे. अशात कोरोनामुळे यंदा उत्सव साजरा न करणे म्हणजे खंड पाडणे योग्य नाही. करिता कित्येक मंडळांनी आपली परंपरा कायम ठेवत शासन निर्देशांना मान देत गणेशोत्सव साजरा केला. आतापर्यंत असलेले मोठाले मंडप व कार्यक्रमांना यंदा या मंडळांकडून बगल दिली जाणार आहे. देखाव्या पेक्षा श्रद्धा महत्वाची असल्याचे या मंडळांनी यंदाच्या उत्सवातून दाखवून दिले आहे.
हनुमान चौक परिसरात एकच गर्दी
मागील काही वर्षांपासून शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात मोठ्या संख्येत मूर्तीकार येत आहेत. हनुमान चौक ते माता मंदिर चौक पर्यंत त्यांचे बस्तान असून ही रांग गोंदियातील चितारओळच बनली आहे. त्यामुळे येथून आपल्या लाडत्या बाप्पाला घरी नेण्यासाठी नागरिकांची शुक्रवारपासूनच गर्दी होती. तर शनिवारी (दि.२२) येथे गर्दी बघता पोलिसांचा बंदोबस्त लावण्याची पाळी आली होती.