२८0 कंत्राटी परिचारिकांच्या कामाचे मूल्यमापन करा
By Admin | Updated: June 4, 2014 00:09 IST2014-06-04T00:09:49+5:302014-06-04T00:09:49+5:30
गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्य सेविकांची २३६ पदे मंजूर आहेत. परंतु गोंदिया जि.प. आरोग्य विभागांतर्गत २८0 कंत्राटी आरोग्य सेविकांची नियुक्ती झालेली आहे.

२८0 कंत्राटी परिचारिकांच्या कामाचे मूल्यमापन करा
कंत्राटी सेविकांची मागणी : सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्य सेविकांची २३६ पदे मंजूर आहेत. परंतु गोंदिया जि.प. आरोग्य विभागांतर्गत २८0 कंत्राटी आरोग्य सेविकांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे पीआयपी अंतर्गत मंजूर पदे व कंत्राटी आरोग्य सेविकांची संख्या पाहता नेहमीच आंदोलन केले जाते. यामुळे जिल्हा परिषदेने कंत्राटी म्हणून असलेल्या २८0 आरोग्य सेविकांच्या कामाचे मूल्यमापन केल्यानंतरच त्यांना नियुक्ती द्यावी, अशी मागणी धरणा आंदोलनावर बसलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी केली आहे.
सोमवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर ४४ कंत्राटी आरोग्य सेविकांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे. १७ मे रोजी जिल्हा परिषद सदस्या स्थायी समितीच्या सभेत अधिकार्यांनी या आरोग्य सेविकांची सेवाज्येष्ठता यादी नसल्याचे मान्य केले. २३६ पदे कंत्राटी आरोग्य सेविकाची मंजूर असताना तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी भिमराव मेश्राम यांनी अधिकच्या आरोग्य सेविकांना नियुक्ती दिल्यामुळे जुन्या कंत्राटी आरोग्य सेविकाही अडचणीत आल्या. परिणामी जिल्हा परिषदेने वर्षभरापूर्वी ९६ आरोग्य सेविकांना सेवेत कमी केले.
त्यामुळे त्या आरोग्य सेविकांनी आंदोलन केल्यामुळे ४४ आरोग्य सेविकांना घेण्यात आले. परंतु मार्चनंतर त्या ४४ आरोग्य सेविकांना पुनर्नियुक्तीचे आदेश दिले नाही. जिल्हा परिषद फक्त २३६ कंत्राटी आरोग्य सेविकांची पीआयपी मंजूर असल्याचे सांगते. परंतु २३६ ठिकाणी कामावर असलेल्या आरोग्य सेविकांचे काम कसे आहे. त्यांचे मूल्यमापन न करता सरळ त्यांना नियुक्ती दिली जाते. तर या ४४ आरोग्य सेविकांना वारंवार आपल्या अधिकारासाठी जिल्हा परिषदेसोबत भांडावे लागते.
जिल्हा परिषदेने २३६ पीआयपीसाठी असलेल्या २८0 कंत्राटी आरोग्य सेविकांच्या कामाचे मूल्यमापन केल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. कंत्राटी आरोग्य सेविकेच्या नियुक्तीबाबत मागील दोन महिन्यापासून त्या ४४ आरोग्य सेविका जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या चकरा काढीत आहेत. जेएसवाय मानव विकास मातृत्व योजनांना सहकार्य करून कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करणार्या या ४४ कंत्राटी आरोग्य सेविकांना जिल्हा आरोग्य अधिकार्याच्या अनागोंदी कारभारामुळे घेण्यात आले नाही.
जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील संपूर्ण कंत्राटी आरोग्य सेविकांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना नियुक्तीचे आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे. या मागणीला घेऊन जिल्हा परिषदेसमोर त्या ४४ आरोग्य सेविका बेमुदत आंदोलन करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)