गोंदिया स्थानकावर एस्कलेटर व लिफ्ट
By Admin | Updated: December 24, 2014 23:01 IST2014-12-24T23:01:00+5:302014-12-24T23:01:00+5:30
गोंदिया रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण मागील वर्षीच पूर्ण झाले. तीन प्लॅटफार्मवरून आता विविध गाड्यांच्या थांब्यासाठी एकूण सात प्लॅटफार्म तयार झाले असले तरी एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर

गोंदिया स्थानकावर एस्कलेटर व लिफ्ट
नववर्षाची भेट : सहा महिन्यात वृध्द व अपंगासाठी सुविधा मिळणार
देवानंद शहारे - गोंदिया
गोंदिया रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण मागील वर्षीच पूर्ण झाले. तीन प्लॅटफार्मवरून आता विविध गाड्यांच्या थांब्यासाठी एकूण सात प्लॅटफार्म तयार झाले असले तरी एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी अपंग व वृद्ध व्यक्तींसाठी कोणतीही सोयी नाही. ही बाब लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने आता गोंदिया रेल्वे स्थानकावर एस्कलेटर (स्वयंचलित पायऱ्या) व लिफ्टची सुविधा करण्याचे नियोजन केले आहे. याचे काम नवीन वर्षात, अर्थात जानेवारी २०१५ पासून सुरू करण्यात येणार आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे स्थानकापर्यंत सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक म्हणून गोंदिया स्थानकाची ओळख आहे. दरदिवशी या स्थानकावरून ६० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या जातात. दरदिवशी जवळपास १९ ते २० हजार प्रवासी गोंदिया रेल्वे स्थानकावरून बाहेरगावी जातात, तर एवढेच प्रवासी दररोज उतरतात. मात्र या रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सुविधा मिळू शकल्या नव्हत्या. दोन वर्षांपूर्वी वृद्ध व अपंगांसाठी एस्कलेटरची सोय करण्यात येईल, असे रेल्वेचे अरूणेंद्रकुमार बोलले होते. या गोष्टीला दोन वर्षांचा कालावधी लोटूनही त्या कामाचा शुभारंभ होवू शकला नव्हता. त्यामुळे वृद्ध व अपंगांना पायऱ्या चढून प्लॅटफार्म जाण्यासाठी किंवा प्लॅटफार्मवरून बाहेर निघण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. आता ही सुविधा अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत उपलब्ध होणार आहे.
एस्कलेटर व लिफ्टसाठी गोंदिया रेल्वे स्थानकाचे निरीक्षण पूर्ण झाले आहे. त्याचे ड्रार्इंग व डिझाईन तयार करून रेल्वे मुख्यालयाला पाठविण्यात आले आहे. त्या संदर्भात निविदेचेसुद्धा काम पूर्ण झाले आहे.
जानेवारी महिन्यात या कामाला सुरूवात होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. हे काम पूर्णत्वास जाण्यास जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
गोंदिया रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफार्म, प्लॅटफार्म-३ व ४ अशा तीन फलाटांवर एस्कलेटरची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच लिफ्टची सुविधा सध्या एकाच प्लॅटफार्मवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे अपंग व वृद्धांना सध्या करावी लागणारी कसरत संपुष्टात येईल.