तंत्रज्ञानाच्या युगात हरविले लहानग्यांचे आजोळ

By Admin | Updated: November 1, 2014 01:58 IST2014-11-01T01:58:56+5:302014-11-01T01:58:56+5:30

संगणक युगात जे हवे ते एका क्लिकवर मिळते. मार्केटिंगच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीनंतर तर संगणकावरुन आप्तेष्टांशी घरबसल्या चर्चा करता येते.

In the era of technology, | तंत्रज्ञानाच्या युगात हरविले लहानग्यांचे आजोळ

तंत्रज्ञानाच्या युगात हरविले लहानग्यांचे आजोळ

गोंदिया : संगणक युगात जे हवे ते एका क्लिकवर मिळते. मार्केटिंगच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीनंतर तर संगणकावरुन आप्तेष्टांशी घरबसल्या चर्चा करता येते. तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीच्या सुटीतील लहानग्यांचे विश्व मात्र संकुचित होत असल्याचे दिसून येते. किल्ले, मामाचे गाव हरवत जात असून आता सुट्यांमध्ये पर्यटनाला जास्त पसंती दिली जात आहे.
मामाच्या गावाला एखादी धावती भेट किंवा एखाद्या घरातील अंगणात नजरेस पडणारा मातीचा किल्ला, एवढेच काय ते जुन्या खुणा शिल्लक असल्याचे समाधान देऊन जाते. अगदी दिवाळीच्या सणात मुलांचे खास आकर्षण म्हणजे मातीचा किल्ला, मामाचे गाव. मात्र मोबाईलच्या सपाट्यात हे चित्र हरवत चालले असल्याचा प्रत्यय येतो. मोबाईलवर गेम्स खेळण्यात दंग असणारी चिमुकली मुले या पारंपरिक आनंदापासून वंचित राहात असल्याचे दिसते. हायटेक जीवनशैलीमुळे मातीचा किल्ला प्रत्यक्षात बनविताना होणारी धावपळ, तगमग, आठ-आठ दिवसांची मेहनत, आईची आरडाओरड, मित्रांची साथ, विसरलेली तहानभूक, मातीचा गंध, किल्ला बनविण्याची चढाओढ कमी झाली. आजोळी मामाच्या गावी जाणे या साऱ्यातील आनंदच जणू कुठेतरी हिरावला गेला असल्याचे भासते. तंत्रज्ञान जसे विकसित झाले, तसा शहरीकरणाचा वेगही वाढू लागला आहे. शहरे मोठी होऊ लागली. या मोठ्या शहरांत ग्रामीण भागातील लहानग्यांचे बालपण मात्र हरवत चालले आहे.
शाळेला दिवाळीच्या सुट्या लागल्या की मामाच्या गावाला जाण्याबद्दल मुले प्रचंड उत्सुक असायची ; पण आता मात्र हा क्लास, तो क्लास, हे शिबिर, ते शिबिर म्हणत दिवाळीची सुटीच संपून जाते आणि मामाचे गाव, दिवाळीत मातीचा किल्लाही मागे पडतो. शहरी भागात काही ठिकाणी किल्ला पहायला मिळतो, तोही रेडिमेड असतो. हा किल्ला मग कुठेतरी गॅलरी, हॉलमध्ये तात्पुरता 'शो' साठी ठेवला जाते. या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या बालपणात तयार केलेली मातीचे किल्ले आजची मुले तयार करताना दिसत नाहीत, हे मोठांना जाणवते. काही ठिकाणी किल्ले बनविण्याच्या स्पर्धा ठेवून मुलांमध्ये आवड निर्माण केली जात आहे.
संगणक युगात हा मायेचा ओलावा, मातीशी आणि आपल्या इतिहासाशी जोडलेली नाळ कुठेतरी तुटत आहे. मोबाईलमुळे या गोष्टी प्रभावित होत असल्याचा प्रत्यय येत आहे. झुकझुक आगीन गाडी या गीतातील ओवींप्रमाणे मामाचा गाव हवेतच विरत असल्याचे दिसते.

 

Web Title: In the era of technology,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.