पर्यावरणाबाबत जागरूकता काळाची गरज

By Admin | Updated: June 5, 2015 01:56 IST2015-06-05T01:56:30+5:302015-06-05T01:56:30+5:30

वृक्ष लागवड व त्यांची जोपासना करण्याचे गांभीर्य आज कमी झाले आहे. भविष्यात पर्यावरणाच्या असंतुलनामुळे प्राणवायुसुध्दा विकत घेण्याची वेळ येणार आहे.

Environmental awareness time need | पर्यावरणाबाबत जागरूकता काळाची गरज

पर्यावरणाबाबत जागरूकता काळाची गरज

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : अत्री येथे पर्यावरण सप्ताह शुभारंभ
गोंदिया : वृक्ष लागवड व त्यांची जोपासना करण्याचे गांभीर्य आज कमी झाले आहे. भविष्यात पर्यावरणाच्या असंतुलनामुळे प्राणवायुसुध्दा विकत घेण्याची वेळ येणार आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता पर्यावरण संतुलनाबाबत प्रत्येक नागरिकाने जागरूक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील अत्री येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवार (दि.३) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ३ ते ९ जून या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या पर्यावरण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते.
अतिथी म्हणून आ. विजय रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. योगेंद्र भगत, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे उपस्थित होते.
डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळात जंगल असतानासुध्दा त्यांनी वृक्षांची लागवड करून जोपासणा केली. महाराजांनी एक फतवा काढून वृक्ष कटाईसाठी परवानगी घेण्याची सूचना केली होती. शालेय जीवनापासून वृक्ष लागवड व जोपासण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देणे आवश्यक आहे. चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अत्री येथील शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान १० झाडे लावावी व त्यांची जोपासना करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
येणाऱ्या काळात एक आदर्श काम अत्री ग्रामस्थांनी पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रात करून इतरांसाठी आदर्श निर्माण करावा असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, या गावातील प्रत्येक व्यक्तीने नऊ वृक्षांची लागवड व जोपासना करून प्राणवायुचा ताळेबंद पाण्याच्या ताळेबंदाप्रमाणे करावा. वृक्ष लागवडीचे नियोजन करून पक्षांनासुध्दा निवाऱ्यासाठी कसा उपयोग होईल, असे वृक्ष लावावे. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती शेतकऱ्यांनी सहायक निबंधकांना द्यावी. शासनाने सन २०१४-१५ या वर्षात खरेदी करण्यात येणाऱ्या धानाला २५० रूपये प्रती क्विंटल बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. बोनस शेतकऱ्यांना हमखास मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी संभ्रमात राहू नये, असेही ते म्हणाले.
डॉ. भगत म्हणाले, ग्रामीण विकासाकडे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी विशेष लक्ष दिले. आज शुध्द हवा व स्वच्छ पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे आवश्यक आहे. लोकांच्या सहभागाशिवाय अभियान, सप्ताह व योजना यशस्वी होत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने काम करावे, असे ते म्हणाले.
अत्रीचे सरपंच धनपाल माहुरे यांनीही मनोगतातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावात करण्यात येत असलेल्या कामाची माहिती देऊन पाण्याच्या ताळेबंदाबाबत माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व आ. विजय रहांगडाले यांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण केले.
या वेळी पंचायत समितीच्या विविध विभागाचे अधिकारी, परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच अत्री ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक गटविकास अधिकारी नारायण जमईवार, संचालन व आभार विस्तार अधिकारी सुरेश निमजे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Environmental awareness time need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.