इंग्रजी शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराची सांगता
By Admin | Updated: December 4, 2014 23:12 IST2014-12-04T23:12:11+5:302014-12-04T23:12:11+5:30
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत गोंदिया जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सालेकसा-आमगाव तालुक्यातील नववी व दहावी वर्गात इंग्रजी विषय शिकविणाऱ्या माध्यमिक

इंग्रजी शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराची सांगता
सालेकसा : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत गोंदिया जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सालेकसा-आमगाव तालुक्यातील नववी व दहावी वर्गात इंग्रजी विषय शिकविणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे पाच दिवशीय प्रशिक्षण आनंददायी वातावरणात पार पडले.
महादेवराव शिवणकर अध्यापक विद्यालय बनगाव येथे झालेल्या या इंग्रजी विषयाचा प्रशिक्षणाला मुख्य प्रशिक्षक म्हणून तज्ज्ञ मार्गदर्शक दिलीप मून यांनी कृती उपक्रम व प्रात्यक्षिक करीत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात शिक्षकांची इंग्रजी विषय शिकविण्याची जुनी पारंपरिक व अनुवादावर आधारित अध्यापन पध्दतीवर अवलंबून न राहता नवीन उपक्रम पध्दतीचा परिचय करून देण्यात आला. नवीन अध्यापन पध्दतीमध्ये शिक्षकांना फेसिलीटेटर आणि विद्यार्थ्यांना लर्णर मानून संपूर्ण अध्यापन पध्दती शिक्षक केंद्रीत न ठेवता ती विद्यार्थी केंद्रीत असली पाहिजे, यावर जास्त भर देण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात विविध प्रकारचे प्रात्यक्षिक व उपक्रम, पूरक कामे देवून फक्त त्यांची मानीटरींग केली पाहिजे. या पध्दतीने विद्यार्थी इंग्रजी बोलण्यास, वाचण्यास व लिहिण्यास लवकर शिकतील व भविष्यात त्यांच्यातील इंग्रजी वियषाची भीती कमी होईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यासाठी प्रशिक्षणात सक्रिय शिक्षणपद्धत व सीपीसी इन्फो गॅप इत्यादी पध्दतींच्या वापरावर भर देण्यात आला. प्रशिक्षणात दोन्ही तालुक्यातील ५० शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले होते. यंदा इंग्रजी प्रशिक्षणाचा हा दुसरा टप्पा झाला असून पुढच्या वर्षी तिसरा व अंतिम टप्पा घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
प्रशिक्षणाची सांगता
कुऱ्हाडी : महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान ब्रिटिश काँसिलचे प्रशिक्षण गोरेगाव तालुका स्तरावर प्रकाश डी.एड. कॉलेजमध्ये पार पडले.
जि.प. गोंदिया शिक्षण विभागाच्या वतीने तसेच गोंदिया जिल्हा डायटच्या माध्यमाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हे प्रशिक्षण पार पडले. माध्यमिक शाळेत वर्ग नववी व दहावीला इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. याचा पहिला टप्पा जिल्हास्तरावर मागील सत्रात घेण्यात आला होता. पुढील दोन वर्षात दोन टप्पे होणार असल्याची माहिती प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासात कमी पडतात. इंग्रजी व गणित विषय त्यांना अवघड वाटतो. सोप्या पध्दतीने इंग्रजी कशी शिकता येईल व इंग्रजीच्या तासिकेत फक्त इंग्रजीचाच वापर कसा करता येईल, याची माहिती प्रशिक्षणार्थी शिक्षकांना देण्यात आली. आता आपापल्या शाळेत जाऊन या प्रशिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना द्यावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा बौध्दीक विकास घडवून ग्रामीण भागातील शिक्षणाचा अविकसीतपणा नष्ट करून विकासाकडे वाटचाल करतील, अशी आशा डायटचे अधिकारी रुद्रकार, मेश्राम यांनी केली.
सदर प्रशिक्षणाला एकूण ३२ शिक्षक उपस्थित होते. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून एम.पी. शेख यांनी पाच दिवसपर्यंत मार्गदर्शन करून इंग्रजीच्या शिक्षकांना प्रशिक्षित केले. (प्रतिनिधी/वार्ताहर)