लघुसिंचन कार्यालयात अभियंत्याची वाणवा
By Admin | Updated: October 24, 2016 00:54 IST2016-10-24T00:54:11+5:302016-10-24T00:54:11+5:30
उपविभागीय अभियंता लघू सिंचन उपविभाग अर्जुनी मोरगाव कार्यालयात सध्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची वाणवा आहे.

लघुसिंचन कार्यालयात अभियंत्याची वाणवा
बोंडगावदेवी : उपविभागीय अभियंता लघू सिंचन उपविभाग अर्जुनी मोरगाव कार्यालयात सध्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. कार्यरत असलेले उपविभागीय अभियंता कार्यालय सांभाळण्याव्यतिरिक्त इतर विकासात्मक कामाला गती देत नाही, अशी व्यथा निर्माण झालेली दिसत आहे. तालुक्यातील बरेच तलाव दुरुस्तीसाठी आहेत. तलाव कामाचे ईस्टीमेट बनविणारे अभियंता वर्ग कार्यालयाला दुर्मिळ झाल्याने तलाव दुरुस्तीच्या कामाला ब्रेक लागल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या अर्जुनी मोरगाव येथे उपविभागीय अभियंता लघू सिंचन जिल्हा परिषद उपविभागाचे कार्यालय आहे. पूर्वी या कार्यालयात शाखा अभियंता होते. तेव्हा नियमित कार्यभार सांभाळणारे उपविभागीय अभियंता नव्हते. कित्येक महिने प्रभारी अधिकाऱ्यावर कार्यालयाची धुरा होती. त्यामुळे विकास कामांना खिळ बसत होती. आजघडीला सदर कार्यालयात उपविभागीय अभियंता नियमित कार्यरत आहेत. कनिष्ठ शाखा अभियंताचे ५ जागा मंजूर आहेत. सध्या २ शाखा अभियंता असले तरी, त्यामधील १ शाखा अभियंता कार्यालयाला भारी डोईजड असल्याचे बोलल्या जाते. येथूृन बदलून गेलेल्या अभियंत्याच्या ठिकाणी दुसरे आले नसल्याने कार्यालय बिनाकामाचे ठरत असल्याचे चित्र दिसते.
आज तालुक्यातील माजी मालजुगार तलाव, बोड्यांच्या दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर आहे. बोंडगावदेवी येथील ‘चिचबोडी तलाव’ मागील काही वर्षापासून पाळ फुटली असताना ईस्टीमेट अभावी ती त्याच अवस्थेत आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांची उणीव कार्यालयात असल्याने बऱ्याच विकास कामांना खीळ बसत आहे. शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यावर वक्रदृष्टी ठेवून कर्मचाऱ्यांचा बॅकलॉग निर्माण करीत आहे. (वार्ताहर)