पुतळ्याभोवती अतिक्रमण
By Admin | Updated: August 12, 2014 00:01 IST2014-08-12T00:01:59+5:302014-08-12T00:01:59+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मारक बांधून त्यांच्या आठवणींची जाणीव नव्या पिढीत रुजावी, त्यांच्या प्रेरणेने नव राष्ट्रनिर्माण व्हावे या हेतूने येथे राष्ट्रपीता

पुतळ्याभोवती अतिक्रमण
आमगाव : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मारक बांधून त्यांच्या आठवणींची जाणीव नव्या पिढीत रुजावी, त्यांच्या प्रेरणेने नव राष्ट्रनिर्माण व्हावे या हेतूने येथे राष्ट्रपीता महात्मा गांधीचा पुतळा उभारण्यात आला. परंतु स्वातंत्र्याच्या या शिल्पकाराच्या पुतळ्याला अतिक्रमणाचा विळखा पडत आहे.
येथे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा वारसा आहे. अनेक स्वातंत्र्यविरांनी महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीला धुडकावून काढण्यासाठी लढा उभारला. या लढ्यात स्वातंत्र्य लढा देणाऱ्यांना विरगती मिळाली तर अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख पुढारी होते. त्यांच्या स्वातंत्र्याच्या तत्वज्ञ बुद्धीने स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली. अंहिसात्मक असहकार आंदोलनाने गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अंहिसात्मक मार्गानी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी जगाला प्रेरित केले. परंतु बदलत्या आधुनिकीकरण व लोकप्रवाहात स्वातंत्र्यविरांना प्रशासन व लोकं विसरत चालल्याची जाणिव या हुतात्म्यांच्या स्मारकांच्या होणाऱ्या हालीमुळे होते.
शहराच्या मध्यभागी मागील २५ वर्षापूर्वी महात्मा गांधींचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला आहे. पूर्वी खुटा चौक नावाने संबोधल्या जाणाऱ्या चौपदरी रस्त्याचे नाव आज गांधी चौक म्हणून ओळखले जात आहे. परंतु पुतळा उभारुन महात्मा गांधींच्या या पुतळ्याचे लोकार्पण झाले नाही. परंतु या महात्म्याला लोकांनी श्रद्धेने दैवत माणून त्यांच्या अर्धकृती पुतळ्याची जोपासना काही काळ केली. कालांतराने या स्मारकाभोवती राजकीय पुढाऱ्यांच्या पोस्टरांनी वेढा घातला.
देखरेखीअभावी पुतळ्याजवळ अतिक्रमण झाले. कचऱ्याचे ढिगारे पसरले. परंतु स्थानिक प्रशासनाने दखल घेतली नाही. तर वाढत्या वाहतुुकीमुळे पादचाऱ्यांना रहदारीस निर्माण होणारी अडचण आता या स्मारकामुळे होत असल्याची ओरड पुढे आली आहे. त्यामुळे महात्मा गांधींचे स्मारक आता जड होऊ लागले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यविरांचे स्मारक विरळ होत चालले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्या विरांची स्मृती जोपासण्याची तसदी देखील आज प्रशासनाकडून घेतली जात नसेल तर या स्वातंत्र्याच्या अर्थच काय असा सवाल मात्र काही सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)