सत्तेची चावी अपक्षांच्या हाती
By Admin | Updated: July 31, 2014 00:05 IST2014-07-31T00:05:30+5:302014-07-31T00:05:30+5:30
येत्या ६ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या गोंदिया नगर पालिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सत्ताधारी काँग्रेस-राकाँसह भाजप-सेनेने चांगलीच कंबर कसर आहे. मात्र आपला एकही

सत्तेची चावी अपक्षांच्या हाती
नगराध्यक्षपदाची निवडणूक : एका भाजप नगरसेवकासह दोन अपक्षही संपर्कात?
गोंदिया : येत्या ६ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या गोंदिया नगर पालिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सत्ताधारी काँग्रेस-राकाँसह भाजप-सेनेने चांगलीच कंबर कसर आहे. मात्र आपला एकही नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागू नये म्हणून भाजपने सर्वांना राजस्थानच्या सहलीवर पाठविले असले तरी एक नगरसेवक अजूनही त्यांच्यासोबत नसल्याचे बोलले जाते. दुसरीकडे अपक्षांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असून दोन अपक्ष उमेदवार सध्या अज्ञातवासात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे निवडणुकीची रंगत आणखीच वाढणार आहे.
येत्या ६ आॅगस्टला विद्यमान नगराध्यक्ष-उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्याच दिवशी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया घेण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या निवडणुकीत काँग्रेसच्या गोटातील तीन नगरसेवकांना अपात्र ठरविल्यामुळे या निवडणुकीतील चुरस आणखीच वाढली आहे. भाजपसाठी नगर परिषदेची सत्ता आता अगदी हातभर अंतरावर आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या रणनितीसाठी नगर परिषदेची सत्ता हातातून गमावणे काँग्रेससाठी मोठे जड जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसकडून आणि सत्ता बळकावण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.
अडीच वर्षापूर्वी ज्या दोन अपक्षांना हाताशी घेऊन काँग्रेस-राकाँने नगर परिषदेवरील सत्ता कायम ठेवली होती त्या अपक्षांना सोबत घेऊनही यावेळी सत्तास्थापनेसाठी त्यांचे संख्याबळ एका सदस्याने कमी पडत आहे. त्यामुळे भाजपमधील एक नगरसेवक आपल्याकडे ओढल्याशिवाय पुन्हा सत्तेत राहणे शक्य नसल्यामुळे त्यादृष्टीने ते प्रयत्नरत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना राजस्थानच्या सहलीवर पाठविण्यात आले आहे.
२४ जुलै रोजी भाजपचे १२ सदस्य राजस्थानकडे रवाना झाले आहेत. त्यानंतर उर्वरीत चार सदस्यांपैकी तीन सदस्यही रवाना झाले. परंतू एक सदस्य अजूनही सहलीवर गेला नसल्याची कुजबूज सुरू आहे. त्यामुळे तो सदस्य काँग्रेस-राकाँच्या गळाला तर लागला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे दोन अपक्षांंना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे सत्तेत उपाध्यक्षपद किंवा सभापतीपद मिळण्याच्या आशेने हे दोन्ही सदस्य आपल्याकडे येतील असा विश्वास भाजपला वाटत आहे. त्यामुळे नगर परिषदेत सत्तेची चावी अपक्षांच्या हाती असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते. नगराध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक शेवटी कोणाच्या पथ्थ्यावर पडते हे अखेरपर्यंत गुलदस्त्यात राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)