वीज पडून तीन बैल ठार
By Admin | Updated: March 18, 2015 00:59 IST2015-03-18T00:59:07+5:302015-03-18T00:59:07+5:30
सोमवारच्या रात्री ११.३० दरम्यान अचानक वादळी-वाऱ्यासह पाऊस बरसला. दरम्यान साखरीटोल्यापासून दोन किमी अंतरावरील...

वीज पडून तीन बैल ठार
साखरीटोला : सोमवारच्या रात्री ११.३० दरम्यान अचानक वादळी-वाऱ्यासह पाऊस बरसला. दरम्यान साखरीटोल्यापासून दोन किमी अंतरावरील हेटीटोला येथील तिलक उमराव चुटे या शेतकऱ्याच्या बैलांच्या गोठ्यावर वीज पडल्याने त्यांचे तीन बैल व एक गाय मृत्यूमुखी पडले. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. मात्र १६ मार्चला पावसाने कहर केला असून सालेकसा तालुक्यातील साखरीटोला परिसरात रात्रीच्यादरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. या वेळी हरभऱ्याच्या आकाराच्या गाराही पडल्या. या गारांमुळे रबी धान तसेच इतर खरिप मालाला मोठा फटका बसला असून झाडांची पाने फाटल्याचे चित्र आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे परिसरात अनेक झाडे कोलमडून पडली तर बऱ्याच घरांची कवेलू उडाली. काही घरावरची टिनांची व सिमेंटची पत्रे उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. साखरीटोला येथे विद्युत खांबावरील तार तुटून पडले होते. या वादळी वाऱ्याचा फटका परिसरातील कारूटोला, हेटीटोला, सातगाव, साखरीटोला, रामपूर, पानगाव या गावांना बसला. रामपूर, पानगाव येथील काही लोकांच्या घरांना तडे गेले तर बऱ्याच घरावरील कवेलू उडाले. कारूटोला येथील रामेश्वर दशरथ मोरे, राधेश्याम लालू खोब्रागडे यांच्या घरावरील टिनाचे शेड उडाले, तसेच लोखंडी पाईप व लाकडी फाट्यांचे मोठे नुकसान झाले. भरतराम कटरे यांच्या घराची भिंत पडली. कैलाश वानखेडे, उमेश मेश्राम यांच्या घरावरील कवेलूंचे नुकसान झाले. हेटीटोला येथील तिलक चुटे यांच्या घराजवळील गोठ्यावर वीज पडल्याने त्यांचे तीन बैल व एक गाय जागीच ठार झाले. त्यांची बैलजोडी यात मृत्यूमुखी पडल्याने शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. तलाठी सलामे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. (वार्ताहर)