विजेच्या लपंडावामुळे वीज ग्राहक झाले हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST2022-04-13T05:00:00+5:302022-04-13T05:00:06+5:30
विलास चाकाटे लोकमत न्यूज नेटवर्क लोहारा : उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची अधिक गरज असताना, वेळी-अवेळी वीज जात असल्याने नागरिकांना उकाड्याचा ...

विजेच्या लपंडावामुळे वीज ग्राहक झाले हैराण
विलास चाकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची अधिक गरज असताना, वेळी-अवेळी वीज जात असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होत असल्याने वीज ग्राहकांनी देवरी तालुक्यातील मुल्ला वीज केंद्राविरुद्ध संताप व्यक्त केला. वीज पुरवठा अचानक खंडित होण्याच्या प्रकारांमुळे व विद्युत दाब कमी-जास्त होण्याच्या प्रकारामुळे पंखे व कुलर बंद पडल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त बनले आहेत.
जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाल्याने कुणी घरी, तर कुणी दुकानात कुलर, पंख्याचा वापर करतात. अशा स्थितीत दिवसभर वीज पुरवठा बंद राहत असल्याने वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला. महावितरणकडून दुरुस्ती कामासाठी वीज पुरवठा बंद राहणार असेल, तर तसे ग्राहकांना एक-दोन दिवस आधी मोबाइलवर ‘एसएमएस’ द्वारे कळविले जाते. परंतु, वीज पुरवठा दिवसभर बंद राहणार असल्याचा कुठलाही संदेश न देता अचानक वीज पुरवठा बंद केला जात असल्याने वीज ग्राहक वैतागले आहेत. पंखे - कुलर बंद पडत असल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिक उकाड्याने हैराण बनतात. मुल्ला वीज केंद्राअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये विजेचा लपंडाव सुरू होता. व्होल्टेजच्या समस्येमुळे पंखे, कुलर, टीव्ही, फ्रीज खराब होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठ्याची गरज
- विजेच्या समस्येमुळे शेतीसाठी देखील सिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वीज ग्राहकांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे. सतत वाढत चाललेल्या तापमानामुळे धान पिके सुरक्षित राहण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असते. अशावेळी वीज पुरवठा महत्त्वाचा असतो. तसेच आठवडाभरापासून तापमानातही वाढ झाल्याने वीज पुरवठा सुरळीत राहणे गरजेचे बनले आहे. यादृष्टीने महावितरण कंपनीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अधिकारी व कर्मचारी नॉट रिचेबल
- मुल्ला वीज केंद्रातील अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना शेतकरी अथवा उकाड्याने त्रस्त बनलेल्या वीज ग्राहकांनी फोन लावले असता, अधिकारी व कर्मचारी नॉट रिचेबल दाखवतो, तर काही कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागत असल्याची वीज ग्राहकांची तक्रार आहे.