रिडिंग न घेताच शेतकऱ्यांना वीज बिल
By Admin | Updated: February 8, 2015 23:35 IST2015-02-08T23:35:19+5:302015-02-08T23:35:19+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरातील शेतकऱ्यांवर रिडिंग न घेताच अधिकचे विद्युत बिल पाठविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर चिड व्यक्त केली जात आहे.

रिडिंग न घेताच शेतकऱ्यांना वीज बिल
शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरातील शेतकऱ्यांवर रिडिंग न घेताच अधिकचे विद्युत बिल पाठविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर चिड व्यक्त केली जात आहे.
कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहणाऱ्या विद्युत विभागाने शेतातील मोटारपंप धारकांना पाच हजारापासून दहा हजारापर्यंतचे बिल रिडिंग न घेताच पाठविले आहे. यामध्ये ९० टक्के शेतकरी नियमित बिल भरणारे आहेत. सध्या या परिसरात रबी पिकांचे रोवणे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्याचप्रमाणे ९० टक्के शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय म्हणून विहिरी व मोटार पंप आहेत. रबी व हंगामी पिकांचे उत्पादन घेणार शेतकरी नियमित बिल भरत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. विद्युत विभागातील कर्मचारी नियमित मोटर पंपची रिडिंग न घेताच उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम करतात. या चुकीच्या बिलाची तक्रार देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना बिल कमी न करता तुम्हाला पूर्ण बिल भरावेच लागणार अन्यथा वीज कनेक्शन कापण्यात येईल, अशी दमदाटी देऊन आल्यापावली परत पाठवण्यात येते, असे शेतकऱ्यांनी बोलून दखवले.
शेतकऱ्यांवर अमाप बिल पाठविण्याची ही पहिलीच वेळ नाही तर शेतकऱ्यांची नेहमीची ओरड आहे. परंतु वीज वितरण कंपनीचे अधिकारी या गंभीर प्रकाराकडे लक्ष न देता अन्यायच करतात, असा आरोपही होत आहे.
दरवर्षीच्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर कोणताही लोकप्रतिनिधी धडाळीने लढताना दिसत नाही. उलट घूमजावची भूमिका घेताना निदर्शनास येत आहे. अशावेळी शेतकऱ्यांचा वाली कोण, हा प्रश्न पुढे येत आहे. नेहमी अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस खालावत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटार पंपची रिडिंग घेवूनच बिल पाठवावे अन्यथा आलेले बिल भरणार नाही व जोडणीसुद्धा कापू देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. (वार्ताहर)