मलेरियाने आठ जणांचा मृत्यू
By Admin | Updated: August 13, 2014 23:56 IST2014-08-13T23:56:16+5:302014-08-13T23:56:16+5:30
जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाची दहशत पाय पसरत आहे. डेंग्यूचा ६ तर मलेरियाचा १० गावांत उद्रेक आहे. गेल्या दोन महिन्यांत मलेरियाचे आठ रूग्ण दगावले. डेंग्यूचा एकही बळी गेला नाही.

मलेरियाने आठ जणांचा मृत्यू
१० गावांत उद्रेक : जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू नाही
नरेश रहिले - गोंदिया
जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाची दहशत पाय पसरत आहे. डेंग्यूचा ६ तर मलेरियाचा १० गावांत उद्रेक आहे. गेल्या दोन महिन्यांत मलेरियाचे आठ रूग्ण दगावले. डेंग्यूचा एकही बळी गेला नाही.
गोंदिया जिल्ह्यातील पिपरटोला, जमुनिया, हिरडामाली, रेहडी, श्रीधरटोला, डुंबरटोला, सिंधीटोला, गोवारीटोला, मुरपार व म्हैसुली या गावात मलेरियाने थैमान घातले. यामुळे आरोग्य विभागाने २ लाख १६ हजार ८०८ रूग्णांची रक्त तपासणी केली. त्यात मलेरियाने १२६ रूग्ण (पीव्ही)पॉझिटीव्ह तर २४६ (पीएफ)पॉझिटीव्ह असे ३७२ रूग्ण मलेरियाने पॉझिटीव्ह आढळले. पीएफ पॉझिटीव्ह रूग्णांमधील ३० टक्के रूग्ण दगावतात असे शासनाचा अंदाज आहे. परंतु २४६ रूग्णांपैकी आठ जणांचा मृत्यू गोंदिया जिल्ह्यात मलेरियाने झाला आहे.
शासनाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी घेतली तर एवढ्या रूग्णांत ७४ रूग्णांचा मृत्यू झाला असता. मलेरियाच्या ६६ रूग्णांचे प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले. मुरपार व म्हैसुली या दोन गावात मलेरियाचे सर्वाधिक रूग्ण होते. मात्र या गावातील एकाही व्यक्तूचा मृत्यू झाला नाही. पिपरटोला, जमुनिया, हिरडामाली, रेहडी, श्रीधरटोला, डुंबरटोला, सिंधीटोला व गोवारीटोला या गावातील प्रत्येक एक अश्या आठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती हिवताप कार्यालयाने दिली.डेंग्यूच्या रूग्णाचे लक्षण आढळलेल्या ३९ जणांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यातील १८ रूग्णांचे नमुने डेंग्यूने पॉझिटीव्ह आढळले. जिल्ह्यातील कोटरा, ताडगाव, सिरेगावबांध, राजोली, कोरंभी, वळद या सहा गावात डेंग्यूचा उद्रेक आहे. परंतु या गावातील एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दवनीवाडा येथे डेंग्यूचा उद्रेक झाला अशी ओरड होती. या गावातील १५ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्या रूग्णांना मलेरिया किंवा डेंग्यू आढळला नाही. या गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तो मलेरिया किंवा डेंग्यूने नाही तर इतर आजाराने झाला, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.