गोंदियात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी प्रयत्न- पटोले
By Admin | Updated: January 13, 2015 23:01 IST2015-01-13T23:01:14+5:302015-01-13T23:01:14+5:30
गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची गती भाजप सरकारच्या काळात कुठेही मंदावणार नाही, असे सांगत गोंदिया जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची

गोंदियात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी प्रयत्न- पटोले
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची गती भाजप सरकारच्या काळात कुठेही मंदावणार नाही, असे सांगत गोंदिया जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती खा.नाना पटोले यांनी येथे दिली.
जिल्ह्याच्या विविध विकासात्मक मुद्द्यांवर पत्रकारांना माहिती देताना खा.पटोले यांनी सांगितले की, पेट्रो केमिकल रिफायनरी (तेल शुद्धीकरण प्रकल्प) आतापर्यंत मध्यप्रदेशातील बिना सोडल्यास केवळ समुद्रतटावरच आहेत. मात्र युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षात्मकदृष्ट्या देशाच्या मध्यवर्ती भागात हा प्रकल्प असणे गरजेचे आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्गादरम्यान हा प्रकल्प उभारल्यास तो सर्व दृष्टींनी सुरक्षित राहील, असे आपण केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांना पटवून दिले असल्याचे खा.पटोले म्हणाले.
क्रुड आॅईलपासून सर्व प्रकारचे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस, डांबर यासारख्या १४ वस्तू तयार केल्या जातात. त्यासाठी रेल्वे आणि महामार्गापासून जवळ असलेली एक हजार एकर जागा घ्यावी लागणार आहे. गोंदिया-बालाघाट मार्ग किंवा गोंदिया कोहमारा मार्गावरील जागा त्यासाठी डोळ्यासमोर असल्याचेही खा.पटोले म्हणाले.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळत नसल्यामुळे आपण समाधानी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत विविध पक्षांच्या ७० खासदारांचा दबावगट बनविण्यात आला असून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पटोले म्हणाले.
गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील काही तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. त्यामुळे निधीवर परिणाम होईल. मात्र काही तालुके पुन्हा नक्षलग्रस्त यादीत जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)