आधीचे ३५ टक्के टार्गेट पूर्ण, आता अठरा वर्षांवरील ८ लाख जण मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST2021-04-21T04:29:07+5:302021-04-21T04:29:07+5:30
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता याला प्रतिबंध लावण्यासाठी १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय ...

आधीचे ३५ टक्के टार्गेट पूर्ण, आता अठरा वर्षांवरील ८ लाख जण मिळणार लस
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता याला प्रतिबंध लावण्यासाठी १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, तसेच त्यासंबंधीचे नियोजन करण्याच्या सूचना आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५० हजार असून, यात १८ वर्षांवरील ८ लाख नागरिकांचा समावेश आहे, तर ४५ वर्षांवरील ४ लाख नागरिकांचा समावेश आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार ३२० नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे, तर २५ हजारांवर नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यातच आता केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८ लाख नागरिक यासाठी पात्र ठरणार असून, यासाठी ८ लाख १२ हजार ८०० लसींची गरज पडणार आहे. त्याचे नियोजन करण्याचे कामसुद्धा आरोग्य विभागाने सुरू केले आहे.
........
दहा दिवस पुरेला एवढा साठा शिल्लक
-गोंदिया जिल्ह्यात एकूण १४० लसीकरण केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत पहिल्या टप्प्यात १ लाख ४० हजारांवर नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला, तर २५ हजारांवर नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला.
- सोमवारी गोंदिया जिल्ह्याला २२ हजार ५०० डोस प्राप्त झाले असून, याअंतर्गत पुन्हा लसीकरणाचा वेग वाढविणात येणार आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याकडे १० दिवस पुरेल एवढा लसीचा साठा उपलब्ध आहे.
.......
लसीकरणात ज्येष्ठ नागरिक पुढे
-जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. यात ६७,३४५ ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे, तर उर्वरितांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणात ज्येष्ठ नागरिकच सर्वांत पुढे असल्याचे चित्र आहे.
- लसीकरणासंदर्भात व्यापक जनजागृती केली जात आहे. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्येसुद्धा लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक केंद्रावर पोहोचत लसीकरण करून घेत आहेत.
............
४५ वर्षांवरील नागरिकांचे ३५ टक्के लसीकरण
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकूण १ लाख ४० हजार नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहेत. यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण ३५ टक्क्यांवर आहे.
- एकूण लसीकरणाची स्थिती पाहता ६७,३४५ ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा आतापर्यंत लाभ घेतला आहे, तर फ्रंट लाइन वर्कर आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण जवळपास ३५ टक्के आहे.
.......
दुसऱ्या डोस काय
-जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १३ लाख ५० हजार ६७९ असून, यापैकी पहिल्या टप्प्यात १ लाख ४० हजार नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे.
- तर २५,२३४ नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. यात ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
- आता १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आठ लाख नागरिक पात्र ठरणार असून, त्यासाठी नियोजन करणे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे.
- ८ लाख नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जवळपास ८ लाख १२ हजार ८०० लसींची गरज भासणार आहे.
............
लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज नाही
जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम व्यापक स्तरावर राबविली जात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एकूण १४० केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात येणार असून, यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज नसून, याच केंद्रावरून लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
..........
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या : १३ लाख ५० हजार ७३५
१८ वर्षांवरील नागरिकांची संख्या : ८ लाख २ हजार ३४५
एकूण महिला : ३ लाख ९६ हजार ६७५
एकूण पुरुष : ४ लाख ४ हजार २३४
..................