उन्हाळी सिंचनक्षेत्रात यावर्षी होणार घट
By Admin | Updated: November 27, 2014 23:35 IST2014-11-27T23:35:47+5:302014-11-27T23:35:47+5:30
बाघ-ईटियाडोह पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यावर्षी रबी-उन्हाळी पिकांसाठी मिळणाऱ्या पाण्यात घट होणार आहे. यावर्षी कमी पावसामुळे धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा नाही.

उन्हाळी सिंचनक्षेत्रात यावर्षी होणार घट
अपुरा पाणीसाठा : गतवर्षीपेक्षा चार हजार हेक्टर कमी सिंचनाचे नियोजन
गोंदिया : बाघ-ईटियाडोह पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यावर्षी रबी-उन्हाळी पिकांसाठी मिळणाऱ्या पाण्यात घट होणार आहे. यावर्षी कमी पावसामुळे धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा नाही. त्यामुळे अवघ्या लाभक्षेत्रातील तीन जिल्ह्यांमिळून ७९०० हेक्टर क्षेत्रातच उन्हाळी हंगामाचे पिकाच्या लागवडीचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे.
ईटियाडोह प्रकल्पाचे पाणी गोंदियासह भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांनाही मिळते. यावर्षी प्रस्तावित नियोजनात गोंदिया जिल्ह्याला प्रस्तावित जलसाठ्याच्या ३५ टक्के पाणी मिळणार आहे. त्यातून २७६५ हेक्टरमध्ये सिंचन होणार आहे. भंडारा जिल्ह्याला २५ टक्के पाणी मिळणार असून त्यातून १९७५ हेक्टर सिंचन होणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक ४० टक्के पाणी मिळणार असून त्यातून त्या जिल्ह्यातील ३१६० हेक्टर शेतीचे सिंचन होणार आहे.
ईटियाडोह प्रकल्पस्तरिय, वितरिकास्तरिय व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत उपविभाग अर्जुनी मोरगाव व वडसा यांच्या अधिकाऱ्यांची बैठक कार्यकारी अभियंता वसंत गोन्नाडे यांच्या उपस्थितीत वडसा येथे झाली. त्यात रबी-उन्हाळी हंगाम २०१४-१५ चे नियोजन करण्यात आले. त्यानुसार अर्जुनी मोरगाव उपविभागातील पाणी वापर संस्थांना ४७०० हेक्टर क्षेत्राकरिता तर वडसा उपविभागातील पाणी वापर संस्थांना ३२०० हेक्टर क्षेत्राकरिता उन्हाळी पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी १२ हजार हेक्टरला सिंचनाचे नियोजन बाघ-ईटियाडोह विभागाने केले होते. प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त सिंचन झाले होते. त्या तुलनेत यावर्षी केवळ ७९०० हेक्टर सिंचनाचे नियोजन करता आले. याबाबत सांगताना कार्यकारी अभियंता गोन्नाडे यांनी म्हणाले, यावर्षी खरिप हंगामात पाऊस कमी पडल्यामुळे पिकांसाठी ३ ते ४ पाळ्या पाणी देण्यात आले. आधीच जलसाठा कमी असताना खरिपातही पाणी वापर झाल्यामुळे रबी-उन्हाळीसाठी कमी नियोजन करावे लागत असल्याचे ते म्हणाले. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे पाण्याचा सदुपयोग होण्यासाठी पाटचाऱ्या सुस्थितीत व प्रवाहक्षम करून ठेवाव्यात तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून अपव्यय टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)