धानपिकावरील रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकरी विवंचनेत
By Admin | Updated: September 2, 2014 23:52 IST2014-09-02T23:52:48+5:302014-09-02T23:52:48+5:30
कधी संततधार तर कधी महिनाभऱ्याचा खंड अशा पडणाऱ्या पावसामुळे धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. महागडी रासायनिक खते व औषधे, मजुरांचा अभाव या समस्यांचे निवारण

धानपिकावरील रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकरी विवंचनेत
गोंदिया : कधी संततधार तर कधी महिनाभऱ्याचा खंड अशा पडणाऱ्या पावसामुळे धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. महागडी रासायनिक खते व औषधे, मजुरांचा अभाव या समस्यांचे निवारण करताच आता धानपिकांवर करपा, गाद, मावा, तुडतुडा, खोडकिडा आदी रोगांनी धानपिकावर आक्रमण केले आहे. यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा विवंचनेत सापडला आहे.
यापूर्वी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने अतिरेक केला. परंतु शेतकरी मागे न हटता मोठ्या कष्टाने रोणीचे काम पूर्ण केले. आता धानाच्या शेताकडे पाहिल्यास काही ठिकाणी हिरवी कंच शेत तर उंच भागावर असलेले धानपिक पिवळे दिसतात. आतल्या आत या धानपिकांना अनेक रोगांनी ग्रासले आहे. त्यामुळे यावर्षीचे पीक किती प्रमाणात हातामध्ये येईल या विवंचनेने बळीराजाला ग्रासले आहे.
करपा या रोगामध्ये बारीक किडे धानातील अन्न शोषण करतात. त्यामुळे धानाला योग्य प्रमाणात अन्न मिळत नसल्याने त्याची पाने तांबुस होतात. याच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम पडत असतो. गाद या रोगामध्ये तांदळापेक्षाही बारीक आकाराचा किडा धानाच्या देठामध्ये असतो. तो आपल्या आत त्या देठाला कुरतडतो. अशा रोपट्यातून धानाच्या लोंबीऐवजी गादशेंगा बाहेर निघते व तो वांझोटा ठरतो. यामुळे मात्र उत्पादनामध्ये फार मोठी घट होत असते.
यावर्षी धानावर खोडकिडा फार मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे सर्वसाधारणपणे उत्पन्न निम्यावर येत असल्याचे जानकारांचे मत आहे. तुरतुडा हा रोग धान निसवल्यापासून तर तोडणीपर्यंत असतो. तुडतुडा हा धानाच्या बुंध्याशेजारी अंडी घालतो. हे किडे धानाच्या अन्नरस शोषून घेतात व पर्यायाने धानाचे उत्पादन कमी होत असते.
या रोगापासून आपल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. विविध कंपन्यांची औषधे बाजारात उपलब्ध आहेत. जाहिरातीमध्ये या कंपन्या मोठमोठी आश्वासने देतात. पण तुलनेने मात्र औषधांचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढलेली आहे. महागड्या औषधांची फवारणी करुन सुद्धा सकारात्मक परिणाम दिसत नसल्याकारणाने औषध कंपन्या देखील आपल्याला फसविण्याचेच काम करत आहेत, असा आरोप देखील अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक शक्तीशाली औषधांची धानपिकांवर फवारणी होत असल्याकारणाने रोगकिड्यांची देखील प्रतिकारशक्ती वाढत आहे. या औषधांच्या फवारणीमुळे अन्नातील पोषक घटक देखील नाहीसे होतात, असेही काही जाणकारांचे मत आहे.
पूर्वी देशी प्रजातींच्या धानावर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव नव्हता. परंतु आता उत्पन्न वाढविणाऱ्या संशोधीत व संकरीत धानावर अधिक प्रमाणात रोगांची लागण होत असताना दिसते. असे असले तरी प्रत्यक्षात नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच होत आहे. यावर्षी तर रोगांचा प्रादुर्भाव अधिक असल्याकारणाने शेतकरी अधिकच संकटात सापडलेला आहे. शेती हा व्यवसायच बेभरवश्याचा झाला आहे.
यासाठी शासनाने जर ठोस उपाययोजना केली नाही तर भावी पिढी मात्र शेती या व्यवसायाकडे ढुकुंही बघणार नाही, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)