प्रलंबित देयकांमुळे बचत गटांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 09:48 PM2018-01-25T21:48:51+5:302018-01-25T21:49:06+5:30

अंगणवाड्यांना पोषण व पोषक आहाराचा पुरवठा करणाऱ्या महिला बचत गटांची देयके मागील दोन वर्षांपासून प्रलबिंत आहेत. परिणामी बचत गटांची आर्थिक कोंडी झाली असून पोषण आहाराचा पुरवठा करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Due to pending payments due to the savings group | प्रलंबित देयकांमुळे बचत गटांची कोंडी

प्रलंबित देयकांमुळे बचत गटांची कोंडी

Next
ठळक मुद्देदोन वर्षांपासून बिल थकीत : पोषण आहार पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : अंगणवाड्यांना पोषण व पोषक आहाराचा पुरवठा करणाऱ्या महिला बचत गटांची देयके मागील दोन वर्षांपासून प्रलबिंत आहेत. परिणामी बचत गटांची आर्थिक कोंडी झाली असून पोषण आहाराचा पुरवठा करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्प अर्जुनी-मोरगाव अंतर्गत नवेगावबांध व परिसरातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार देणाऱ्या महिला बचत गटांचे फेबु्रवारी २०१७ पासून आणि किशोरवयीन मुलींचे २०१५ ते २०१६ चे आहार वाटपाचे देयक थकीत आहेत. त्यामुळे बचत गटांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पूर्वी सरकारी स्वस्त धान्य दुकानातून ७ रुपये प्रती किलो दराने ५० किलो याप्रमाणे बचत गटांना तांदळाचा पुरवठा केला जात होता. मात्र मागील १७ महिन्यांपासून पुरवठा बंद करण्यात आला. परिणामी महिला बचत गटांना बाजारातून २० रुपये प्रती किलो दराने तांदूळ खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मागील १० महिन्यांपासून बचत गटांच्या आहार शिजविणाऱ्या महिलांचे मानधन सुद्धा मिळालेले नाही. त्यामुळे या महिलांना सुद्धा विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन महिला आर्थिक बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मात्र दुसरीकडे प्रशासकीय दप्तर दिंरगाईमुळे महिला बचत गटांची आर्थिक कोंडी होत आहे. थकीत देयकांसाठी बचत गटांनी वांरवार संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. परिणामी थकीत देयकांसाठी बचत गटांची पायपीट कायम असल्याचे चित्र आहे.
शासनाकडूनच पुरवठा बंद
मागील काही महिन्यांपासून शासनाकडून अंगणवाडीला धान्य पुरवठा करण्यासाठी धान्य उपलब्ध करुन देणे बंद झाले आहे. त्यामुळे बचत गटांना धान्य पुरवठा कोठून करायचा असा प्रश्न आहे. शासनाने धान्य उपलब्ध करुन दिल्यास पुरवठा करण्यास काहीच अडचण नसल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकांची तक्रार
नवेगावबांध क्षेत्राच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका येथील अंगणवाडी केंद्रांना नियमित भेट देत नसल्याची तक्रार आहे. अंगणवाडीच्या समस्या व अडचणींची दखल प्रशासनाकडून वेळीच घेतली जात नसल्याचे अंगणवाडी सेविकांचे म्हणने आहे. यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शासनाने सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्य पुरवठा बंद केला. त्यामुळे अतिरिक्त दराने बचत गटांना धान्य खरेदी करावे लागत आहे. अंगणवाडीतील बालकांना खिचडी, उसळ, सोजी, नास्ता द्यावा लागतो. मात्र आहाराची देयके न मिळाल्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
- भीमाबाई शहारे,
सिद्धार्थ महिला बचत गट, नवेगावबांध.
ग्रामीण भागातील मुलींच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन किशोरवयीन मुलींना आहार द्यावा लागतो. जो आहार कंत्राटदाराकडून पुरविला जातो तो खाण्या योग्य नाही. तो गुरा-ढोरांच्या घशात जातो. पुर्वी स्थानिक बचत गटांकडून या आहाराचा पुरवठा केला जात होता. चिक्की, पेंडखजूर, राजगिºयाचे लाडू असा सकस आहार दिला जात होता. किशोरवयीन मुलींचा आहार पुरविण्याचे कंत्राट पुर्वीप्रमाणे महिला बचत गटांनाच द्यावे.
-शीतल राऊत,
रमाबाई महिला बचत गट.
धाबेपवनी व नवेगावबांध बीटाचा प्रभार तसेच विस्तार अधिकाऱ्यांचाही प्रभार माझ्याकडे आहे. यामुळे कामाचा व्याप अधिक असल्याने अंगणवाड्यांना भेट देण्याचे प्रमाण कमी आहे. अंगणवाड्यांना धान्य पुरवठा करण्याबाबत अर्जुनी-मोरगावच्या तहसीलदारांंना पत्र दिले आहे.
-वीणा वैद्य
अंगणवाडी पर्यवेक्षिका

Web Title: Due to pending payments due to the savings group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.