गहाळ फाईलमुळे यंदा शाळांचे बक्षीस लांबणीवर
By Admin | Updated: September 1, 2014 23:41 IST2014-09-01T23:41:51+5:302014-09-01T23:41:51+5:30
गोंदिया जि.प.च्या ‘गावची शाळा आमची शाळा’ अभियानासंबंधीच्या पुरस्काराबाबतची फाईल गहाळ झाली होती. त्यामुळे हे जिल्हास्तरीय पुरस्कार अजून जाहीर झालेले नाही.

गहाळ फाईलमुळे यंदा शाळांचे बक्षीस लांबणीवर
गोंदिया : गोंदिया जि.प.च्या ‘गावची शाळा आमची शाळा’ अभियानासंबंधीच्या पुरस्काराबाबतची फाईल गहाळ झाली होती. त्यामुळे हे जिल्हास्तरीय पुरस्कार अजून जाहीर झालेले नाही. या प्रकारामुळे गावची शाळा आमची शाळा अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर होण्यास विलंब लागत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गावची शाळा आमची शाळा अभियानाची फाईल गहाळ झाली होती. त्यामुळे या पुरस्कारासाठी आतापर्यंत शाळांची निवडच झाली नसल्याचे वास्तव आहे.
या प्रकाराबाबत सर्वशिक्षा अभियान जि.प. गोंदियाचे शिक्षण विस्तार अधिकारी शिरसाठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आता गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पाची फाईल हाती आली आहे. तालुकास्तरीय निकालही हाती आले आहेत. मात्र समितीच्या सदस्यांच्या अनुपस्थितीत शाळांची निवड करता येत नाही. त्यामुळेच या प्रकल्पाच्या पुरस्कार वितरणास विलंब होत आहे. मात्र लवकरच पुरस्कारांसाठी शाळांची निवड करून ७ किंवा ८ सप्टेंबरला गावची शाळा आमची शाळा अभियानाची जिल्हास्तरिय पुरस्कार जाहीर करू, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेमध्ये ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. त्यात जिल्हाभरातील आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांना पुरस्कार दिले जातात. मात्र शिक्षक दिनाचा कार्यक्रम तीन-चार दिवसांवर येवून ठेपला असतानाही आतापर्यंत आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आलेली नाही.
आदर्श शिक्षकांच्या निवडीसाठी २५ आॅगस्ट रोजी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यात समितीचे सदस्य गैरहजर असल्यामुळे आदर्श शिक्षकांची निवड होवू शकली नाही. त्यामुळे शिक्षक दिनी दरवर्षी होणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ यावर्षी होणार किंवा नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
जि.प. गोंदियाच्या सर्वशिक्षा अभियानातील शिक्षण विस्तार अधिकारी शिरसाठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.१) जि.प. गोंदियात आदर्श शिक्षकांच्या निवडीसाठी बैठकीचे आयोजन पुन्हा करण्यात आले आहे. समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहिल्यास आदर्श शिक्षकांच्या नावांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर ती यादी मंजुरीसाठी मंगळवारी (दि.२) नागपूरला विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. यादी मंजूर होवून आल्यावर ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षकांच्या नावांची घोषणा करून त्यांना पुरस्कार वितरित करण्यात येतील.
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमानंतरच गावची शाळा आमची शाळा प्रकल्पाचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरीत करण्यात येतील. त्यासाठी ७ किंवा ८ सप्टेंबर ही तारीख तात्पुरती ठरविण्यात आली आहे. या दरम्यान शाळा निवडीची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यास या प्रकल्याचेही पुरस्कार वितरण करण्यात येईल, असे एन.जे.शिरसाठे यांनी सांगितले आहे. एकूणच या सर्व कामात संबंधित यंत्रणेचा ढिसाळपणा समोर आल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)