वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: June 19, 2014 23:54 IST2014-06-19T23:54:51+5:302014-06-19T23:54:51+5:30
तालुक्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नवीन उद्योगांना चालना मिळत आहे. परंतु प्रदुषणयुक्त उद्योगांनी पर्यावरणाची योग्य काळजी घेतली नसल्याने या उद्योगांमुळे प्रदुषणात वाढ झाली आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
आमगाव : तालुक्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नवीन उद्योगांना चालना मिळत आहे. परंतु प्रदुषणयुक्त उद्योगांनी पर्यावरणाची योग्य काळजी घेतली नसल्याने या उद्योगांमुळे प्रदुषणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आमगाव तालुक्यात धानाच्या वाढत्या पिकामुळे या ठिकाणी तांदुळ भरडाई उद्योगांचे मोठ्या प्रमाणात मोठे मिल उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणात पोल्ट्री उद्योग, खासगी व शासकीय रुग्णालयातील घनकचरा, ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यातील साचलेले गाळ या सर्वांमुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आमगाव तालुक्यात राईस मिलर्सचा उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या राईस मिलमध्ये कुजलेले धान्य भरडाई अधिक प्रमाणात आहे. या तालुक्यात उष्णाचे तांदुळ बनविण्यासाठी अनेक रासायनिक पद्धतीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तांदुळ बनविण्याच्या प्रक्रियेनंतर निघणारे रासायनिक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट व्यवस्थित नसल्याने प्रदुषणयुक्त टाकाऊ पदार्थ व घाणयुक्त पाण्याचा नागरिकांच्या वस्तीतून निचरा होत नाही. त्यामुळे नागरिक वस्तीतील पिण्याच्या सोईयुक्त असलेल्या सिंचन विहिरी, पाण्याचे डोह यामध्ये मिसळून हे रासायनिक टाकाऊ पदार्थ व पाणी नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरले आहे. बनगाव येथील द्वारकाधाम येथील राईस मिलमधून मोठ्या प्रमाणात कुजलेले धान्य उडून परिसरातील रहिवाशांच्या घरांवर पसरत आहे. यामुळे नागरिकांना मोठा धोका निर्माण झालेला आहे.
सदर काळ्या रंगाच्या राखेमुळे लहानमुलांना फुफ्फुसांचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्णा तांदुळाची निर्मिती करताना वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ व टाकाऊ पाण्यामुळे होणारे जलप्रदुषण वातावरणात पसरले आहे. तर राईस उद्योग व इतर उद्योगांच्या टाकाऊ कचऱ्यामुळे शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. परिसरातील शेतात या पाण्याचा निचरा होत असल्याने शेतीसुद्धा नापीक होत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील प्रदुषणयुक्त उद्योगांना मंजुरी देताना जिल्हा प्रदूषण नियंत्रण बोर्ड नियमांना डावलून प्रस्ताव पारीत करीत असते. नुकतेच उद्योग सुरु झाले की त्यांच्याकडून कितीही प्रदुषण पसरले तरीही प्रदुषण नियंत्रण बोर्ड लक्ष घालत नाही. या विभागात तक्रार करुनही नागरिकांना दाद मिळत नाही. जिल्हा प्रदुषण नियंत्रण बोर्ड केवळ कागदावरच असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. सदर होणाऱ्या या राखेच्या दुषित कणांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण बोर्ड व मिल मालकाने योग्य ती कार्रवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा द्वारकाधाम नगरातील नागरिकांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)