नक्षलग्रस्त यादीतून वगळल्याने विकासनिधीला कात्री
By Admin | Updated: December 29, 2014 01:42 IST2014-12-29T01:42:55+5:302014-12-29T01:42:55+5:30
राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारने जिल्ह्यातील चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. यामुळे जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनेक विकास योजनांच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे,

नक्षलग्रस्त यादीतून वगळल्याने विकासनिधीला कात्री
गोंदिया : राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारने जिल्ह्यातील चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. यामुळे जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनेक विकास योजनांच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे, अशी खंत खा.प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकारांशी बोलताना खा.पटेल यांनी जिल्ह्यातील अनेक कामांच्या प्रगतीला राज्य व केंद्र सरकारकडून कशी खिळ बसत आहे याचे विवेचन केले. गेल्यावर्षी आपले सरकार असताना अशाच पद्धतीने काही तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आले होते. जिल्हा नक्षलग्रस्त असणे ही काही भूषणावह बाब निश्चितच नाही. पण मागास जिल्ह्यांना या निमित्ताने मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागू नये, येथे काम करण्यास इच्छुक नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना या निमित्ताने मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यामधून त्यांना येथे काम करण्यास प्रवृत्त करावे ही भूमिका ठेवून मी सरकारदरबारी शब्द टाकला. आ.राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आणि पुन्हा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना नक्षलग्रस्तांच्या यादीत समाविष्ठ केले होते. मात्र नवीन सरकारने हा निर्णय पुन्हा फिरवून या जिल्ह्याच्या विकासनिधीला कात्री लावली आहे, अशी खंत पटेल यांनी व्यक्त केली.
गेल्यावर्षी आम्ही धानाला हमीभावासोबत बोनस मिळून प्रतिक्विंटल १५४० आणि १५१० असा भाव दिला. पण नवीन सरकारकडून केवळ १३६० रुपये हमीभाव दिला जात आहे. त्यातही अनेक ठिकाणी कमी भावात शेतकऱ्यांकडील धान खरेदी करून त्यांची पिळवणूक सुरू आहे. सरकारचे ‘अच्छे दिन’ हेच आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
विद्यमान खासदारांनी (नाना पटोले) धानाला ५००० रुपये हमीभाव देण्याची मागणी संसदेत केली. आम्हालाही असे वाटते. संसदेच्या अधिवेशनात शून्य तासात मी सुद्धा धानाला खर्चावर आधारित योग्य भाव देण्याची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात सरकारने भ्रमनिरासच केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ मोठमोठ्या गोष्टी करून चालणार नाही तर आता करून दाखवावे लागेल, असा टोलाही खा.पटेल यांनी लगावला.
यावेळी पटेल यांनी राज्य व केंद्र सरकारमधील राजकीय घडामोडींवरही मनमोकळेपणाने चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी असलेल्या जवळीकबद्दल त्यांना छेडले असता आपले सर्वांशीच चांगले संबंध आहेत, असे सांगून याचा वेगळा अर्थ काढू नये, असे ते म्हणाले. यावेळी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)