अवकाळी पावसाने जलस्तर कायम
By Admin | Updated: August 23, 2015 00:08 IST2015-08-23T00:08:54+5:302015-08-23T00:08:54+5:30
मागील पाच वर्षाच्या तुलनेत सन २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाण्याच्या पातळीला तारण्यात आले.

अवकाळी पावसाने जलस्तर कायम
गोंदिया : मागील पाच वर्षाच्या तुलनेत सन २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाण्याच्या पातळीला तारण्यात आले. मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पाण्याची पातळी सरासरीच्या तुलनेत कमी झालेली नाही. मागील पाच वर्षाच्या तुलनेत ०.१ मीटरने पाण्याची पातळी वर आली आहे.
पाण्याचा वापर वाढल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी दरवर्षीपेक्षा एक मीटरने खोल जाणे अपेक्षित होते. परंतु सन २०१४ च्या जून ते सप्टेंबरदरम्यानही वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पाऊस पडला. त्यानंतर सन २०१५ च्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे पाण्याची पातळी जमिनीच्या खोल गेली नाही.
मागील पाच वर्षात जमिनीच्या पृष्ठभागापासून ८.५५ मीटर खोल पाण्याची पातळी होती. यावर्षी ती पातळी ८.५४ असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिली आहे. शेतीचे सिंचन करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतीतही जवाहर विहीरींचा लाभ घेऊन त्या ठिकाणी बोअर करून आपल्या शेतीला सिंचन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे निश्चितच पाण्याची पातळी खोल जात आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाण्याची पातळी खोल गेली नाही.
अकाली पावसामुळे पाण्याचा वापरही कमी झाला. तसेच गोळा झालेले पाणी जमिनीत मुरले. जिल्ह्याची मागील पाच वर्षाची भूजलपातळी ८.५५ होती. यावर्षी ८.५४ मीटर आहे. (तालुका प्रतिनिधी)
विहिरी, बोअरमधील पाण्याची पातळी खालावली
जमिनीतील पाण्याची कायम असल्याचे भूवैज्ञानिक सांगत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी, बोअरला पाहीजे तसे पाणीच नाही. सध्या पावसाअभावी काही शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. बोअरमधील पाण्याने पाणी देण्याचा प्रयोग शेतकरी करीत असले तरी त्यांना पाणी मिळेनासे झाले आहे. भर पावसाळ्यात ही स्थिती आहे. तरीही सरकारी यंत्रणा जमिनीतील पाण्याची पातळी कायम असल्याचे सांगत असल्यामुळे ही बाब आश्चर्यकारक ठरत आहे. यावर्षी अजून सरासरीच्या तुलनेत बराच कमी पाऊस बरसला आहे. आता पावसाचा जेमतेम एक महिना शिल्लक आहे. या दिवसात पाऊस न झाल्यास रबी हंगामात शेतकऱ्यांना पिक घेणे कठीण होणार आहे.
जलस्तर वाढविण्यासाठी विविध योजना
जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शासनाचे जुने धोरण पाणी अडवा, पाणी जिरवा कायम आहे. त्याचबरोबर पाण्याच्या पुनर्भरणाच्या पध्दती, रेन वॉटर हार्वेस्टींग, जलयुक्त शिवार अभियान, सिमेंट बंधारे, तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, साठवण बंधारे तयार करण्यात येतात. यामुळे जमिनीतील पाण्याचा स्तर वाढविण्यास हे घटक महत्वाचे ठरत आहेत.